Pune : पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल क्लिनिक; खासदार अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करुन दिवस-रात्र खडा पहारा देणाऱ्या पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी केली पाहिजे या खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांच्या संकल्पनेतून आज हडपसर परिसरात मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात आले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गेला महिनाभर रस्त्यावर बंदोबस्त करताना स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस बांधव कर्तव्य बजावत आहेत. सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या या पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांची ‘जगदंब प्रतिष्ठान’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून आणि नोबल हॉस्पिटलच्या सहकार्यातून मोबाईल क्लिनिक सेवा सुरू करण्यात आली. या मोबाईल क्लिनिकचा प्रारंभ आज खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांच्या उपस्थितीत हडपसर गाडीतळ चौकातील पुलाखाली बंदोबस्ताला असलेल्या पोलीसांची आरोग्य तपासणी करून करण्यात आला.

येत्या काही दिवसांत हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन राबविलेल्या या उपक्रमाला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व ‘जगदंब प्रतिष्ठान’चे समन्वयक अमोल हरपळे, नोबेल हॉस्पिटलचे डॉ. दिलीप माने सर , डॉ. एम. बी. अबनाळे, डॉ. सचिन आबनावे, डॉ. साळे, डॉ. प्रशांत चौधरी, पोलीस उपायुक्त श्री. सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, पोलीस निरीक्षक रमेश साठे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.