Moshi : सराईत गुन्हेगाराला अटक; पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 4 लाख 87 हजार 20 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे चिखली आणि नवी मुंबईमधील खांडेश्वर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने मोशी येथे केली.

सागर आत्माराम गायकवाड (वय 23, रा. मोरया चौक, कचरा डेपो समोर, आदर्श नगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी दरोडा विरोधी पथकाची एक टीम पिंपरी-चिंचवड शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक किरण काटकर यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सागर मोशी येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार पवन्या बाबर, सचिन पवार, विकास ऊर्फ टिकल्या काजळकर यांच्यासोबत मिळून देहू-आळंदी रोडवर चिखली येथील एका दुकानाचे शटर उचकटून चोरी केली. त्याच्याकडून पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील 37 हजार 20 रुपयांचा ऐवज जप्त केला.

  • आरोपीकडे कसून चौकशी करत असताना त्याने सांगितले की, त्याने त्याचे साथीदार पवन्या बाबर आणि सचिन पवार यांच्यासह मिळून नवी मुंबईमधील खांडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पिकअप (एमएच 46 / एएफ 9118) चोरून त्या पीकअपमधून चिखली येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील माल वाहून नेला होता. पोलिसांनी सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा पिकअप देखील जप्त केला. आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून एकूण 4 लाख 87 हजार 20 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील घरफोडीचा एक आणि खांडेश्वर पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, गणेश हजारे, उमेश पुलगम, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, निशांत काळे, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.