MP Shrirang Barne : शिवसेनेला धक्का! खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात; निवासस्थानाबाहेर बंदोबस्त

एमपीसी न्यूज – शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) हे दाखल झाले आहेत. शिंदे गटात गेल्याने खासदार बारणे यांच्या थेरगावातील निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही शिंदे गटात गेले आहेत. आढळराव यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भोसरीचे 10 वर्षे संसदेत प्रतिनिधीत्व केले आहे. आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याने पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेतील 39 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे आमदारांचा मोठा गट शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर आता खासदारही गेले आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिवसेना गटनेते विनायक राऊत यांच्याजागी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे हा 12 खासदारांचा शिवसेनेतला मोठा गट लोकसभेत होईल. त्यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषद आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहेत. आमदारांनी वेगळ गट केला. पण, लोकसभेत राहुल शेवाळे यांची गटनेतेपदीच नियुक्ती केली. त्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बारणे शिंदे गटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले.

Pune News : पुणे शहरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुखपदी कोण?

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात खासदार बारणे (MP Shrirang Barne) यांची ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेत. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवाळे यांच्या नियुक्तीला मी पाठिंबा दिला आहे. संसदीय कामामध्ये राहुल शेवाळे यांची जास्त सहकार्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सगळे शिवसेनेशी संलग्न आहोत”.

 

खासदार श्रीरंग बारणे का गेले शिंदे गटात?

मावळ लोकसभा मतदारसंघाचे श्रीरंग बारणे सलग दोनवेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, खालापूर हे मतदारसंघ येतात. मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजपची समान राजकीय ताकद आहे. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड, पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. कर्जतचे शिवसेना आमदार  महेंद्र थोरवे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे शिंदे गटात गेले आहेत. पिंपरी आणि मावळात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मावळात राष्ट्रवादीचा आमदार असला. तरी, भाजपची संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करुन खासदार बारणे यांनी भाजपसोबत युती केलेल्या शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे. हा निर्णय घेऊन खासदार बारणे यांनी 2024 मध्ये पुन्हा दिल्लीत जाण्याचा मार्ग सुकर केल्याचे बोलले जात आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही शिवसेनेला जय महाराष्ट्र
शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आढळराव हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भोसरीचे 10 वर्षे आढळराव यांनी संसदेत प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिरुरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे या आढळराव यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे आल्हाट, उबाळे हे काय भूमिका घेतात. आढळराव यांच्यासोबत शिंदे गटात दाखल होतात की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतात हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.