CM Eknath Shinde : आमच्याकडे 18 खासदार; मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्लीत गौप्यस्फोट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा वेग घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रात्री दीड वाजता दिल्लीमध्ये दाखल झाले. राजधीनी दिल्लीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून चर्चा करणार आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते भाजप नेत्यांशी चर्चा करतील, असे म्हंटले जात आहे.

 

शिवसेनेचे बारा खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत.मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहिर करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले आहेत. रात्री अकराच्या सुमारास ते विमानाने दिल्लीला निघाले आणि दीड वाजता ते पोहचले. मंत्रिमंडळ विस्तार होणे अद्याप बाकी आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे  (CM Eknath Shinde) दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

मुख्यमंत्री रात्री दिल्लीत आल्यावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे खासदार आम्हाला भेटतील. आमच्याकडे 12 नव्हे तर 18 खासदार आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.लोकशाहीत बहुमताला महत्व असते, असे ते म्हणाले.

 

 

 

मंत्रिमंडळ विस्तार आणि खासदारांशी चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच सोमवारी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला होता. मुर्मू यांना पाठींबा द्यावा यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांनी उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणला होता. खासदार राहुल शेवाळे, खासदार राजेंद्र गावित यांनी तर याबाबत उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 12 खासदारांचा एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.आज त्या बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.