MPC News Special : पोलिसांना पेट्रोलिंगसाठी दिलेल्या सायकल धूळखात

एमपीसी न्यूज – शहरात पोलिसांचा वावर दिसावा तसेच पोलिसांची प्रकृती (MPC News Special) तंदुरुस्त राहावी, यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये सायकलचे वाटप करण्यात आले. मात्र या सायकल वापराअभावी धुळखात पडल्या आहेत.

पोलिसांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विविध उपक्रम राबविले त्याचाच एक भाग म्हणजे पोलीस ठाण्यांमध्ये सायकलींचे देखील वाटप करण्यात आले. या सायकलचे वाटप जानेवारी 2021 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या सायकलींना मडगार्ड नसल्याने पावसाळ्यात चिखलाचे शिंतोडे वर्दीवर उडतात, यामुळे या सायकल पोलिसांनी अडगळीत ठेवून दिल्या.

हिवाळ्यातही या सायकल पोलिसांनी गस्तीसाठी बाहेर काढल्या नाहीत. सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दिवस पाळीतील कर्मचारी सायकलवरून गस्त घालतील. तसेच रात्रपाळीसाठी आलेले कर्मचारी आठ ते दहा वाजेपर्यंत गस्त घालतील. असे सुरुवातीला नियोजन करण्यात आले होते. याशिवाय पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान पोलिसांचे गुड मॉर्निंग पथक देखील सायकल वरून परिसरात गस्त घालतील असे सांगण्यात आले होते.

पहाटेच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग वाढल्यास पहाटेच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांना काळा बसेल असा त्यामागील (MPC News Special) हेतू होता. मात्र पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली होताच पोलिसांनी सायकली अडगळीत ठेऊन दिल्या.

Narayangaon : बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची अमोल कोल्हे यांची घोषणा

शारीरिक हालचाल मंदावली –

हल्लीचे पोलीस टेक्नोसेव्ही झाले आहेत. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर काहीजण थेट गुगल मॅपची मदत घेतात. खासगी दुचाकी, चारचाकी मधून घटनास्थळी जाणाऱ्या पोलिसांची संख्याही अधिक आहे. या सगळ्यामुळे पोलिसांची शारीरिक हालचाल मंदावली आहे. त्यामुळे सायकलवरून पेट्रोलिंग करण्यास हल्ली पोलीस धजावत नाहीत. त्याचीच दुसरी बाजू अशी की, हल्ली पोलिसांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची क्रेझ वाढली आहे. व्यायामासाठी म्हणून काही पोलीस सायकल चालवतात. पण ड्युटीवर असताना सायकल चालवणे थोडे दुरापास्तच झाले आहे.

पायी पेट्रोलिंगचे आदेश –

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहावा यासाठी महासंचालक कार्यालयाकडून घटक प्रमुखांना पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात देखील पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरु केली आहे. सायंकाळी पाचनंतर सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी पायी पेट्रोलिंगसाठी बाहेर पडावे. नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले. त्यामुळे देखील सायकलचा वापर कमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.