MPC News Special : महावितरणशी संबंधित फसवणुकीचे प्रकार वाढताहेत; ग्राहकांनो सतर्क व्हा

एमपीसी न्यूज – एमएसईबीमधून बोलत असल्याची बतावणी (MPC News Special) करून वीजबिल थकल्याचे सांगत ते भरण्यासाठी नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेत नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिल्या आहेत. कोणताही अनोळखी फोन आल्यानंतर तत्काळ क्रिया करण्यापूर्वी फोनवरील व्यक्तीची खातरजमा करा. फोनवरील व्यक्ती जे काही सांगत आहे, त्यात काही तथ्य आहे का, हे स्वतः तपासून पाहणे आवश्यक आहे.

मी महावितरणच्या कार्यालयातून बोलत आहे. तुमचे मागील काही महिन्यांचे वीजबिल थकले आहे. ते तत्काळ भरावे लागेल. वीजबिल भरले नाही, तर तुमचा विजपुरवठा खंडित केला जाईल, अशी भीती फोनवरील व्यक्ती दाखवतात. अलीकडच्या काळात वीज ही माणसाची निकडीची गरज बनली आहे. विजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वच कामांचा खोळंबा होतो. त्यामुळे वीजबिल तत्काळ भरण्यासाठी काहीजण मागचा पुढचा विचार न करता निमुटपणे संमती देतात.

वीजबिल भरण्यासाठी तुमच्या बँकेची माहिती लागेल, असे बोलून नागरिकांकडून त्यांच्या बँकेची संपूर्ण माहिती घेतली जाते. त्या माहितीच्या आधारे नागरिकांच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढून घेतले जातात. काही वेळेला नागरिकांना क्विक सपोर्ट, एनी डेस्क, स्क्रीन मिररिंग, स्क्रीन शेअर अशी अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले जाते. नागरिकांनी त्यांच्या फोनमध्ये अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर फोनचा एक्सेस मिळवून त्याआधारे देखील नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले जातात. पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारे लाखो रुपये सायबर भामट्यांनी हडप केले आहेत.

मग लक्षात येतो फसवणुकीचा प्रकार –

नागरिकांकडून बँकेची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून भलीमोठी रक्कम काढून घेतली जाते. बिलापेक्षा अधिक रक्कम खात्यातून वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. अशा वेळी शक्य तेवढ्या लवकर नागरिकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार करणे गरजेचे असते. ज्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे, त्या खात्याचे व्यवहार थांबविण्याबाबत पोलिसांकडून बँकांना पत्रव्यवहार केला जातो. यामुळे काही प्रमाणात रक्कम तत्काळ परत मिळवता येऊ शकते.

एका आरोपीला बेड्या – MPC News Special

एमएसईबी मधून बोलत असल्याची बतावणी करून वीजबिल थकल्याचे सांगत ते भरण्यासाठी बँक खात्याची गोपनीय माहिती घेत नागरिकांना गंडा घालणाऱ्या विकास भिमहतो मंडल (वय 28, रा. कापका, बरकट्टा, जि. हजारीबाग, झारखंड) याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून काही गुन्ह्याची उकल झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस म्हणतात –

महावितरणशी संबंधीत फसवणूकीचे प्रकार अधिकाधिक वाढत आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती घ्यावी. त्यात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

 

 

महावितरणकडून खबरदारीचा इशारा –

अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या एसएमएस, कॉल, व्हाट्सअप संदेशांना प्रतिसाद देऊ नये. महावितरण नागरिकांना कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण केवळ VM-MSEDCL / VK-MSEDCL / AM-MSEDCL / JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते. कोणत्याही वैयक्तिक मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवत नाही. SENDER ID मधील पहिली दोन अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात. त्यापुढील अक्षरे जिथून संदेश पाठवला जात आहे तो आयडी दर्शवतात. महावितरण MSEDCL या आयडी वरून ग्राहकांना संदेश पाठवत असते. ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका.

तर इथे तक्रार करा

महावितरणच्या नावाने फसवणूक झाल्यास ग्राहकांनी जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in यावर देखील ग्राहकांना ऑनलाइन तक्रार नोंदवता येऊ शकेल. तसेच अधिक माहितीसाठी महावितरणच्या 1912 / 19120 / 18002123435 / 18002333435 या क्रमांकवर ग्राहकांना संपर्क करता येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.