Mahavitaran : मोबाईल क्रमांक, ई-मेलची नोंदणी करा; महावितरणचे वीजबिल तात्काळ मिळवा

एमपीसी न्यूज – मोबाईल क्रमांक व ई-मेलची केवळ नोंदणी (Mahavitaran) केल्यानंतर महावितरणकडून संबंधित वीजग्राहकांना तात्काळ दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत महावितरणकडे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीत 82 लाख 48 हजार 347 मोबाईल क्रमांकांची आणि 14 लाख 95 हजार 562 ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करून दोहोंद्वारे दरमहा वीजबिल मिळविण्याची सोय आहे.

महावितरणने बिलींगची प्रक्रिया सेंट्रलाईज पद्धतीने सुरु केली आहे. त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 मधील एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. त्यानंतर केवळ एक ते दोन दिवसांमध्ये वीजबिल तयार करण्यात येत आहेत. वीजबिल तयार झाल्यानंतर ते मोबाईल किंवा ई-मेलद्वारे तात्काळ मिळविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी केवळ मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

वीजबिलाच्या तारखेपासून सात कार्यालयीन दिवसांमध्ये तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास एक टक्का सवलत दिली जाते. त्याची तारीख वीजबिलामध्ये नमूद केली जाते. ‘एसएमएस’ किंवा ई-मेलद्वारे वीजबिल घेतल्यास ही सूट मिळवणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास इतरही अनेक फायदे आहेत. यात पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, रिडींग घेतल्याची तारीख व वीजवापराच्या युनिटची संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदी माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे(Mahavitaran) सर्व वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी करावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

DGP Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

पश्चिम महाराष्ट्रात 82 लाख 48 हजार 347 मोबाईल क्रमांकाची तर 14 लाख 95 हजार 562 ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 41 लाख 5 हजार 150 मोबाईल तर 10 लाख 85 हजार 630 ई-मेल, सातारा जिल्हा- 10 लाख 11 हजार 191 मोबाईल तर 1 लाख 1 हजार 278 ई-मेल, सोलापूर जिल्हा- 10 लाख 51 हजार 874 मोबाईल तर 92 हजार 376 ई-मेल, कोल्हापूर जिल्हा- 11 लाख 88 हजार 15 मोबाईल तर 1 लाख 35 हजार 956 ई-मेल आणि सांगली जिल्ह्यात 8 लाख 92 हजार 117  मोबाईल तर 80 हजार 322 ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे.

अशी करा ई-मेल/मोबाईल क्रमांकाची नोंदणी- महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करण्याची सोय आहे. तसेच वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून 9930399303 क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री 1912 किंवा 18002123435 किंवा18002333435 क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.