MPC News Special : स्मार्ट सिटीत आता सिग्नलही स्मार्ट; वाहनांची संख्या पाहून ठरते सिग्नलची वेळ

एमपीसी न्यूज – आयटी हब म्हणून नावारूपास (MPC News Special) आलेल्या हिंजवडीमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. अपुरे रस्ते आणि लाखो वाहने यामुळे अवघ्या काही किलोमीटरसाठी काही तासांचा कालावधी लागत असल्याचे चित्र आयटी नगरीत आहे. यावर मात करण्यासाठी एका आयटी अभियंत्याने स्मार्ट सिग्नल यंत्रणा सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने विनोदे वस्ती येथे प्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेल्या या सिग्नलने प्रवाशांचा वेळ कमी केला आहे.

प्रदीप गिलबिले हे आयटी इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांची स्वतःची डेटा मॉर्फोसिस टेक्नॉलॉजी नावाने कंपनी सुरु केली आहे. प्रदीप गिलबिले रावेत येथे राहण्यास असून त्यांचे ऑफिस हिंजवडी येथे आहे. घरापासून ऑफिसपर्यंत येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे प्रचंड वेळ वाया जातो. त्यावर काही उपाय शोधता येईल का, असा प्रश्न त्यांना पडला. हिंजवडी परिसरात विप्रो कंपनी चौक, शिवाजी चौक, लक्ष्मी चौक, मेझा नाईन चौक, विनोदे नगर, काळा खडक, भूमकर चौक, कस्पटे वस्ती अशा आठ ते दहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी गिलबिले यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय), रियल टाईम डेटाबेस यांच्या आधारे संशोधन करून त्यांनी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केला.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. त्याच वेळी स्मार्ट सिग्नलसाठी यंत्रणा राबविल्यास वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो, असा प्रस्ताव गिलबिले यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्याकडे मांडला. उपायुक्त भोईटे यांना स्मार्ट सिग्नलचा प्रस्ताव आवडला. त्यानंतर त्यांनी वाकड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांना यामध्ये समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. एक वर्षभर काम केल्यानंतर एप्रिल 2023 मध्ये तयारी पूर्ण झाली आणि प्रायोगिक तत्वावर वनोदे वस्ती येथील चौकात स्मार्ट सिग्नलची यंत्रणा राबविण्यात आली.

वाहनांची संख्या पाहून वेळ सेट होते – MPC News Special

सिग्नलवर चारही बाजूंनी किती वाहने आहेत. कोणत्या दिशेला जास्त वाहने आहेत. एका वाहनाला सिग्नल पास करण्यासाठी किती वेळ लागेल. अशा सर्व बाबींचा विचार करून स्मार्ट सिग्नलची वेळ आपोआप सेट होते. जोपर्यंत सर्व वाहने पास होत नाहीत, तोपर्यंत सिग्नल हिरवा राहतो. तर एकाच वेळी सर्व बाजूने वाहनांची संख्या वाढली तर वाहतूक मूविंगमध्ये राहील, अशा पद्धतीने सिग्नलची वेळ सेट होते.

ग्रीन कॉरिडॉरची सुविधा –

सिग्नलवरील कॅमेऱ्याच्या टप्प्यात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंब येताच त्या वाहनांना वाट करून दिली जाते. ही वाहने पास होताच पुन्हा वाहनांच्या संख्येप्रमाणे सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरु होते. अतिमहत्वाच्या व्यक्तींचा ताफा जात असेल तर आत्ताच्या घडीला सुमारे 15 ते 20 मिनिटे वाहतूक अडवून ठेवली जाते. त्यामुळे सर्वच बाजूने वाहनांची प्रचंड गर्दी होते. स्मार्ट सिग्नल यंत्रणेत यावर उत्तर शोधण्यात आले आहे. दोन सिग्नल अगोदर अतिमहत्वाच्या व्यक्तीचा ताफा दिसताच पुढचे केवळ दोन सिग्नल वाहतूक रोखली जाते. यासाठी सुमारे एक ते दोन मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी झाल्याने वाहतूक कोंडी होत नाही.

दंडात्मक कारवाईसाठी उपयोगी –

सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारच्या कारवाया देखील या स्मार्ट सिग्नलच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांचे उत्तम प्रतीचे फोटो काढून ते संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून वाहन मालकापर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा देखील ऑटोमॅटिक केली जाते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांसोबत हुज्जत घालण्यात वाहतूक पोलिसांचा वेळ वाया जाणार नाही.

Pimpri : पिंपरी शहरासह लगतच्या महामार्गावर महावितरण उभारणार इव्ही चार्जिंग स्टेशन्स

सराईत गुन्हेगारही सापडतील –

पोलिसांनी तडीपार केलेले आरोपी राजरोसपणे शहरात फिरतात. अनेकजण पुन्हा गुन्हे करतात. अनेक सराईत गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांना अपयश येते. अशा वेळी स्मार्ट सिग्नल यंत्रणा पोलिसांना उपयोगी ठरू शकते. या यंत्रणेत फेस आयडेंटिफिकेशनची सुविधा देण्यात येऊ शकते. त्यामुळे सिग्नलवर आलेल्या व्यक्तीची सॉफ्टवेअरच्या आधारे ओळख पटवणे सोपे जाते. तडीपार, फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती सॉफ्टवेअरमध्ये ठेवल्यास त्या माहितीशी जुळणारी माहिती दिसताच सिग्नलवरून थेट पोलिसांना फोटोसह सूचना मिळण्याची व्यवस्था करता येऊ शकते.

अपघाताची माहिती क्षणात मिळेल –

चौकात अपघात झाल्यानंतर चूक कोणाची यावरून वाद वाढतो. अपघाताची माहिती मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत स्मार्ट सिग्नल उपयोगी ठरणार आहे. सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या कक्षेत एखादा अपघात घडला तर त्याचा तात्काळ फोटो काढून त्या सिग्नलवर जे पोलीस ड्युटीवर असतील त्यांच्या मोबाईलवर त्याचे फोटो आणि माहिती जाण्याची व्यवस्था यात आहे. एखाद्या सिग्नलवर पोलीस नसतील तर जवळच्या वाहतूक विभाग, पोलीस ठाण्यात देखील ही माहिती शेअर करता येऊ शकते. यामुळे परिस्थिती हाताळणे पोलिसांना आणखी सोपे होते.

लाखोंचा खर्च –

स्मार्ट सिग्नलसाठी कंट्रोलर, सर्व्हर, कॅमेरा, सॉफ्टवेअर अशा महत्वाच्या बाबींची गरज आहे. एका चौकातील स्मार्ट सिग्नल सक्षमतेने चालविण्यासाठी सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.एखाद्या परिसरात वाहतूक कोंडी होत असेल तर तिथे सिग्नल बसविण्यासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी पोलिसांकडे मागणी करतात. वाहतूक पोलीस संबंधित ठिकाणी सिग्नलची मागणी होत आहे, तसेच तिथे आवश्यकता आहे अशा प्रकारची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे करतात. स्थानिक स्वराज्य संस्था प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) सूचना देण्याबाबत मागणी करते. आरटीओकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन सिग्नल बसविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सिग्नल बसविण्याबाबत टेंडर काढते.

पिंपरी-चिंचवडचे सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या उपक्रमाची माहिती घेऊन वेळोवेळी चर्चा केली आहे. तत्कालीन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या उपक्रमासाठी परवानगी देऊन सहकार्य केले. त्यासोबत सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांचेही भरपूर सहकार्य मिळाले असल्याचे प्रदीप गिलबिले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.