MPC NEWS VIGIL : ‘ती’ वासनांधतेची शिकार; वर्षभरात बलात्काराच्या 121 घटना

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – वासनांध पुरुषी अहंकार आणि मानसिकतेच्या गराड्यात ती अजूनही अडकली आहे. विश्वास संपादन करून, वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्या स्वप्नांचा चुराडा केला जातो. नंतर तिच्यावर बलात्कार करून तिच्यासह तिच्या भावनांना देखील कुस्करले जाते. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 121 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

जानेवारी, फेब्रुवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले. या महिन्यात अनुक्रमे 18, 19, 13, 20, 15 प्रकरणांची शहरातील विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कठोर लॉकडाऊननंतर बलात्काराच्या गुन्ह्यांत वाढ झाली असल्याचे आकडेवारी सांगत आहे. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या घटनांना त्यानंतर वाचा फोडण्यात आली आहे. कठोर लॉकडाऊनच्या काळात देखील बलात्काराच्या गुन्ह्यांची थोड्या अधिक प्रमाणात नोंद झाली आहे.

अल्पवयीन मुली, तरुणी तसेच विवाहित महिलांना लग्नाचे आमिष दाखवले जाते. लग्नाची भुरळ पाडून नवीन स्वप्ने दाखवली जातात. त्यात त्यांना अडकवून त्यांच्या मनाविरोधात त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले जातात. आपली कामवासना शमवल्यानंतर तिच्या मतांचा, तिच्या स्वप्नांचा आणि एकंदर तिचा विचार केलाच जात नाही. त्यानंतर मग अशी प्रकरणे पोलीस दप्तरी दाखल केली जातात.

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून न्यायचे. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आणि काही दिवसांनी लग्न न करता परत घरी यायचे. असेही प्रकार शहरात घडले आहेत. ऑगस्ट महिन्यात आळंदी परिसरात एक विवाहित महिला शेतात गवत कापण्यासाठी जात होती. एका व्यक्तीचे तिचे कारमधून अपहरण केले. तिला धुळ्याला नेले. तिच्यावर बलात्कार केला. याबाबत नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटकही केली.

लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्यावर बंधने होती. त्यामुळे त्या काळातील प्रकरणे नंतरच्या काळात दाखल करण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या काळात पिंपरी-चिंचवड शहरात 158 बलात्कारांची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली. तर यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत शहरात 121 बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी असले तरीही भयानक आहे.

अकरा महिन्यातील बलात्काराच्या दाखल झालेल्या घटना –
जानेवारी – 18
फेब्रुवारी – 19
मार्च – 8
एप्रिल – 2
मे – 3
जून – 8
जुलै – 8
ऑगस्ट – 13
सप्टेंबर – 20
ऑक्टोबर – 15
नोव्हेंबर – 7

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.