Mumbai : दडपणाखाली आव्हानाचा पाठलाग करण्यात विराट सचिनपेक्षा सरस -ए बी डिव्हिलियर्स

एमपीसी न्यूज – सर्वच क्रिकेट प्रकारात सचिनने उत्तम कामगिरी केली आहे आणि यात कोणाचेही दुमत असू शकत नाही. पण, दडपणाखाली आव्हानाचा पाठलाग करण्यात विराट सचिनपेक्षा सरस असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स म्हणाला आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए बी डीव्हिलियर्स हे दोघेही गेली 9 वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या IPL संघातून खेळत आहेत. एबी डीव्हिलियर्सने विराट कोहली हा ‘एका बाबतीत’ सचिनपेक्षा सरस असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. इन्स्टाग्राम लाईव्ह वरून संवाद साधताना तो बोलत होता.

डीव्हिलियर्स म्हणाला, सचिन तेंडुलकर हा आम्हा दोघांचा आदर्श आहे. सचिन त्याच्या काळात ज्याप्रकारे खेळला आणि त्याने ज्याप्रकारे विविध विक्रम मोडीत काढले, ती बाब वाखाणण्याजोगी आहे. त्याने युवा पिढीसाठी एक उत्तम उदाहरण ठेवले. विराटदेखील ही गोष्ट मान्य करेल.

विराटपण हेच म्हणेल की, सचिन एक सर्वोत्तम खेळाडू होता. पण, वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की, जेव्हा आव्हानांचा पाठलाग करण्याची वेळ येते. तेव्हा विराट हा सचिनपेक्षा उत्कृष्ट आहे, असे मत डिव्हिलियर्सने व्यक्ते केले आहे.

विराट कोहली आणि डिव्हिलियर्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांची सतत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. तसेच क्रिकेट मधील मतमतांतराबद्दल ते दोघे आपले विचार मांडत असतात.

लाॅकडाऊनमुळे सर्व क्रिडा प्रकार अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडू सोशल नेटवर्किंग साइटवर लाईव्ह चॅट करून आपली मते व्यक्त करत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.