Mumbai News : केंद्र सरकारने याप्रकरणाची सखोल चौकशी करावी – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नसल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, ‘गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. मूळात ज्यांनी आरोप केले, ते परमबीर सिंग यांना एक वर्ष झालं आहे. लॉकडाउनमुळे त्यांना 12 कोटी देता आली नसेल, पण गृहमंत्र्यांने अशी गोष्ट सांगणं… गृहमंत्री राज्याचे असतात. राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे.’

परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं. त्यांची बदली का केली गेली हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं. जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही, त्यांची बदली का केली गेली? सरकारने अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली‌.

मुकेश अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे. त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडतात आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. केंद्राकडून या गोष्टीचा तपास व्हायला हवा. याचा तपास झाला, तर धक्के बसतील असे चेहरे समोर येतील, असे रात ठाकरे म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजिनाम्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.