Mumbai News : वीज बिलात सवलत देणे अशक्य : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

याबाबतचा निर्णय फक्त राज्य सरकार निर्णय घेईल, असे म्हणत त्यांनी स्वतः हात झटकत पुढील निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. 

एमपीसीन्यूज : राज्यातील वीज ग्राहकांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठा झटका दिला आहे. ग्राहकांना दिवाळीआधी वीज देयकात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केली होती. मात्र, आता महावितरणची एकूण परिस्थिती पाहता अशी सवलत देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबतचा निर्णय फक्त राज्य सरकार निर्णय घेईल, असे म्हणत त्यांनी स्वतः हात झटकत पुढील निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधताना वीज देयकात सवलत देणे अशक्य असल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने महावितरणचे वीज ग्राहक आहेत, त्याचप्रमाणे महावितरणही एक ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावी लागते. विविध प्रकारचे शुल्क द्यावे लागते.

सध्या महावितरणची 31 टक्के थकबाकी आहे. ग्राहकांकडून देयके भरली जात नाहीत. त्यामुळं वीज देयकात सवलत देणे अशक्य आहे.

मात्र, कोणाचीही वीज जोडणी कापली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा विभागातील कंपन्यांवर 69  हजार कोटी रुपयांचा कर्जभार आहे. आता आणखी किती कर्ज काढणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली. मात्र, दुर्दैवाने केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.