Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग होतोय का मृत्यूचा सापळा? दहा महिन्यात झाले ‘इतके’ अपघात!

एमपीसी न्यूज : मुंबई – पुणे (Mumbai-Pune Highway) द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस आणि राज्य परिवहन विभागाकडून खबरदारी घेतली जाते. मात्र, असं असतानाही अपघात आणि अपघातातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबई-पुणे महामार्गावर 399 अपघातात 170 नागरिकांचा मृत्यू झाला. तर, या अपघातात 292 गंभीर जखमी झाले आहेत.

यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 168 अपघात झाले आहेत. या अपघातात 68 नागरिक मृत्युमुखी पडले असून 92 नागरिक गंभीर जखमी झाले आहे. याशिवाय मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर याच कालावधीत 231 अपघात झाले असून 102 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर, 160 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

2021 मध्ये मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 200 अपघातात 88 लोकांचा मृत्यू झाला होता. तर, 146 नागरिक गंभीर जखमी झाले होते. तर, मुंबई-पुणे जुन्या (Mumbai-Pune Highway) महामार्गावर 278 अपघातात 149 लोकांचा मृत्यू झाला होता. 144 नागरिक गंभीर जखमी झाले होते.

Maval News : आंदर मावळातील नळ पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन

दरम्यान, या दोन्ही महामार्गावर सातत्याने होणारे अपघात पाहता अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आणि वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी या दोन्ही महामार्गावर सहा महिन्यांसाठी 24 तास सुरक्षा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येता एक डिसेंबर पासून त्याला सुरुवात होणार आहे.

या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची 12 पथक तयार करण्यात आली आहेत. यामध्ये 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील सहा पदके आणि पंधरा अधिकारी हे प्रत्येकी दोन्ही महामार्गावर 24 तास कार्यरत राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.