Mumbai : ‘या’ गोलंदाजाच्या मनात तीन वेळा आला होता आत्महत्येचा विचार!

एमपीसी न्यूज – माझे घर 24 व्या मजल्यावर असून घरातील कोणी ना कोणी माझ्यावर नेहमी नजर ठेवून असायचे, जर घरातल्यांनी मला योग्य प्रोत्साहन आणि साथ दिली नसती तर मी कधीच क्रिकेट सोडून दिले असते एवढेच नव्हे तर तीन वेळा माझ्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेला, असा धक्कादायक खुलासा भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांने केला आहे.

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांने रोहित शर्मा याच्याशी इंस्टाग्राम लाईव्ह  चर्चेदरम्यान हा खुलासा केला आहे. मोहम्मद शमी म्हणाला 2015 च्या वर्ल्डकप पूर्वी मी दुखापतग्रस्त झालो आणि त्यानंतर मला टीम मध्ये स्थान मिळवण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी गेला हा काळ माझ्या आयुष्यातील फारच कठीण काळ होता. दुखापतीमधून बाहेर पडण्याचा काळ किती कठीण असतो, हे सर्व खेळाडूंना माहिती आहे. त्यानंतर आयपीएल सुरू होण्याच्या दहा-पंधरा दिवस अगोदर माझा अपघात झाला होता, कौटुंबिक कलह सुरू झाले आणि माध्यमांमध्ये या गोष्टीची उलटसुलट चर्चा सुरू झाली.

शमी पुढे म्हणाला की, या कठीण काळात मला जर कुटुंबाची साथ नसती मिळाली तर मी क्रिकेट सोडून दिले असते. आम्ही 24 व्या मजल्यावर राहतो त्यामुळे घरातील कोणी ना कोणी नेहमी माझ्यावर नजर ठेवून असायचे, त्यांना असे वाटायचे की मी या मजल्यावरून खाली उडी मारेन. एवढेच नव्हे तर तीन वेळा माझ्या मनात सुद्धा आत्महत्येचा विचार आला होता. पण घरातल्यांनी मला हिम्मत दिली आणि फक्त खेळावर लक्ष देण्यास सांगितले, जी गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतोस त्या गोष्टीवर लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. अशा कठीण काळात कुटुंबापेक्षा मोठी ताकत काय असू शकते.

माझा भाऊ माझ्याबरोबर नेहमी चर्चा करत असे इतर मित्र सुद्धा मला हिम्मत देण्याचा प्रयत्न करत होते. या काळात मी पुन्हा प्रॅक्टीस सुरुवात केली. चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजीचा नियमित अभ्यास करू लागलो या कठीण प्रसंगात माझी साथ देणार्या या लोकांना मी कधीच विसरू शकणार नाही असे मोहम्मद शमी लाईव्ह चॅट दरम्यान म्हणाला.

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी  हंसी जहाँ यांचा वाद 2018 मध्ये बाहेर पडला होता. मोहम्मद शमी च्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता, एवढेच नाही तर मॅच फिक्सिंगमध्ये सुद्धा तो सामील असल्याचे तिने सांगितले होते. मोहम्मद शमीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे सांगत त्यांच्या व्हाट्सअप चॅटिंग स्क्रीनशॉट सुद्धा शमीच्या पत्नीने शेअर केले होते. बीसीसीआयने फिक्सिंगच्या आरोपाची चौकशी होईपर्यंत शमीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते पण तो त्यातून निर्दोष मुक्त झाला. पत्नीच्या वादाच्या केसमधून सुद्धा तू निर्दोष मुक्त झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.