Mumbai:  कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ – एकनाथ शिंदे

Toll waiver for devotees going for Ganeshotsav in Konkan - Eknath Shinde

एमपीसी न्यूज – कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात मंत्री  शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे.

त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे मंत्री  शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी  आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना शिंदे यांनी  दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.