Pune News : महापालिका राबवणार ‘हर घर दस्तक’ मोहीम

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका क्षेत्रामध्ये एक ते सव्वा लाख नागरिकांनी अध्याप पहिला डोस घेतलेला नाही. तसेच शहरातील लसीकरण केंद्रावर येऊन लसीकरण घेणार्‍यांची संख्या देखील रोडावली आहे. त्यामुळे महापालिका टास्क फोर्सच्या मदतीने ‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन लस न घेतलेल्या लोकांचं समुपदेशन करून लसीकरण करणार आहे.

पुण्यामध्ये 100% लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी टास्कफोर्सचा वापर केला जाणार असून क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, परिमंडळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत झाली. याशिवाय, या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचीही मदत यासाठी घेतली जाणार आहे

केंद्र आणि राज्य सरकारच्या कागदोपत्री यादीनुसार पुण्यामधील सर्व लाभार्थ्यांचा पहिला डोस झाला आहे. परंतु, महापालिकेच्या अंदाजानुसार अद्याप एक ते सव्वालाख नागरिकांचा पहिलाच डोस अजून राहिला आहे. त्यामुळे त्यांना शोधून त्यांचे समुपदेशन करून त्यांचे लसीकरण करून घेणे हे आव्हान सध्या महापालिकेपुढे आहे. त्यासाठी ‘हर घर दस्तक’ ही मोहीम महापालिकेने दोन दिवसांपूर्वी सुरू केली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असलेला टास्कफोर्स त्यांच्या भागामध्ये फिरून लसीकरण न झालेल्यांची यादी बनवणार आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही त्यांचे समुदेशन केले जाणार आहे. त्यानंतर अशांची यादी बनवली जाणार असून, जर एखाद्या भागात, गल्ली मोहल्ल्यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असेल तर तेथे लसीकरणाचे स्पेशल सेशन आयोजित केले जाणार असल्याचे डॉ. देवकर म्हणाले.

अनेकजणांनी पहिला डोस घेतला आहे, परंतु दुसरा डोस घेतला नाही. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी २८ दिवस उलटून गेले तरी दुसरा डोस घेतलेला नाही आणि कोविशील्डचा पहिला डोस घेऊन १२ ते १६ आठवडे उलटूनही दुसरा डोस घेतला नाही, अशांना दुसऱ्या डोसचे स्मरण करून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापालिकेतील लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.