Nigdi News : कॅन्टोन्मेंट हद्दीतील 1242  कुटुंबांची महापालिका तहान भागविणार

 'ना नफा ना तोटा' तत्वावर दररोज पाच लाख लिटर पाणीपुरवठा करणार

एमपीसी न्यूज – भौगोलिक असमतोलामुळे मुलभुत सुविधांपासून वंचित राहिलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असणा-या निगडीतील सिद्धीविनायक नगरी परिसरातील 1 हजार 242 कुटुंबांची तहान पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत भागविली जाणार आहे. पालिकेमार्फत ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर या भागात प्रतिदिन पाच लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून घरगुती वापरासाठी प्रति युनिट 16 रूपये 54 पैसे आणि व्यापारी वापरासाठी प्रति युनिट 55 रूपये 13 पैसे असा दर आकारण्यात येणार आहे.

निगडी येथील वाहतुकनगरी लगतचा सिद्धीविनायक नगरी, श्रीविहारनगरी, श्रीनगरी, दत्तनगर, आशिवार्द कॉलनी हा भाग देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येतो. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत हा भाग असल्याने या भागास मानवतेच्या दृष्टीकोनातून पूर्वीपासून महापालिकेतर्फे दैनंदीन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या भागात एकूण 38 नळजोड आहेत. संबंधित नळजोड हे त्या-त्यावेळी नावानिशी महापालिका सभेत मंजुर करण्यात आले आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असूनही जलवितरण व्यवस्थेअभावी आशिर्वाद कॉलनी, दत्तनगर या भागातील सुमारे 35 ते 40  कुटूंब पाण्यापासून वंचित आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी गेल्या दोन वर्षात महापालिकेशी पत्रव्यवहार करून या परिसरात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत महापालिकेद्वारे एक स्वतंत्र पाणी कनेक्शन सीईओ, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या नावाने मंजुर करण्याबाबत विनंती केली आहे. याची देयके कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे भरण्याची ग्वाही दिली आहे. बोर्डाचे सीईओ यांनी त्यांच्या विभागामार्फत या परिसरात सर्व्हे केला. त्यांच्या हद्दीत 1242 मालमत्तांची नोंद असून त्याची लोकसंख्या अंदाजे 6 हजार 210 इतकी आहे. या लोकसंख्येसाठी 135  लिटर प्रति माणसी व प्रति दिनी अशी एकूण 8 लाख 38 हजार 350 लिटर प्रतिदिनी पाण्याची आवश्यकता असल्याबाबत त्यांनी कळविले आहे.

या मागणीप्रमाणे स्वतंत्र नळजोड मंजुर केल्यास या नळजोडापासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डामार्फत त्यांच्या हद्दीत स्वतंत्रपणे वितरण नेटवर्क विकसित केले जाईल. या वितरण नेटवर्कमध्ये बोर्डाच्या सर्व्हेक्षणानुसार एकूण 1242 कुटूंबासाठी अस्तित्वातील 38 नळजोडांसह इतर नळजोड त्यांच्यामार्फत मंजुर केले जातील. हे नळजोड त्या नेटवर्कवर स्थानांतरीत केले जातील. नेटवर्कवर महापालिकेमार्फत स्वतंत्र जलमापक बसविण्यात येईल. या जलमापकाच्या रिडींगनुसार वापरलेल्या पाणी परिमाणाचे पाणी बील हे सीईओ, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या नावाने देण्यात येईल.

सद्यस्थितीतील पाणीपुरवठा वितरण स्थिती पाहता नळजोडाचा व्यास हा सहा इंच ठेवण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत पाण्याचा दर हा प्रचलीत स्लॅब व टेलीस्कोपिक पद्धतीचा आहे. ही पद्धत कॅन्टोन्मेंट बोर्डाला अवलंबणे शक्य होणार नाही. तसेच व्यापारी दराने आकारणी करणेही योग्य होणार नाही. त्यामुळे उत्पन्न, वितरण खर्चाचा विचार करून ना नफा ना तोटा तत्वावर पाण्याचा दर आकारण्यात येणार आहे. घरगुती वापरासाठी प्रति युनिट 16 रूपये 54 पैसे असा असणार आहे. तर, पाच टक्के पाण्याचा वापर व्यापारी गृहित धरून त्यासाठी प्रति युनिट 55 रूपये 13 पैसे असा दर ठेवण्यात येणार आहे. या दरात दरवर्षी पाच टक्के वाढ केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.