Pimpri News : महापालिका विद्युत खांबांवरील अवैध जाहिरात फलक काढणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्युत खांबांवरील 2 बाय 3 फूट आकाराचे अवैध जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करून हे फलक काढण्यासाठी तीन ठेकेदारांची नेमणूक  करण्यात आली आहे. हे फलक ठेकेदारांकडून स्वखर्चाने काढून ते नेहरूनगर येथील महापालिका गोदामात जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी एका फलकामागे ठेकेदाराला 16 रुपये 29 पैसे देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महापालिकेच्या विद्युत खांबांवरील 2 बाय 3 फूट आकाराचे अवैध जाहिरात
फलक क्युऑक्स लावण्यास परवानगी देण्याचे काम महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून केले जाते. परवानगी न घेता असे फलक लावल्यास ते आकाशचिन्ह परवाना विभागाकडून काढले जातात. विद्युत खांबांवर बऱ्याच ठिकाणी परवानगी न घेताच जाहिरात फलक लावले जातात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. यावर बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी येतात. यासाठी विद्युत खांबांवर जाहिरात हक्क दिल्यास अवैध फलक क्युऑक्स लावले जाणार नाहीत.

जाहिरातदार मंजुरी घेऊनच अशा प्रकारचे फलक लावतील आणि महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच शहराचे विद्रुपीकरणही होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन खांबांवरील 2 बाय 3 फूट या आकाराचे क्युऑक्स अवैध जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करून हे फलक स्वखर्चाने काढून ते नेहरूनगर येथील महापालिका गोदामात जमा करण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, गणेश एंटरप्रायजेस, कापसे एंटरप्रायजेस व आर. एस. इन्फ्रा या ठेकेदारांचे एक क्युऑक्स काढण्यासाठी 16 रुपये 29 पैसे असे लघुत्तम दर प्राप्त झाले. त्याचे दर स्वीकृत केले आहेत. त्यानुसार करारनामा करून कामाचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.