Sangvi News : ट्रॅव्हल्समध्ये चार्जिंग पॉईंट विचारल्याने आई-मुलाला मारहाण

क्लीनर आणि चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असताना मुलाने चार्जिंग पॉईंट कुठे आहे, असे विचारले असता ट्रॅव्हल्समधील क्लिनर आणि सेकंड चालकाने मुलाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

चालक विष्णू रामराव जलाले (वय 39), क्लिनर शुभम विष्णू जलाले (दोघे रा. रा. रामबाईनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रवासी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा खुशाल ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत होते. जुनी सांगवी येथे फिर्यादी आणि त्यांचा मुलगा बसमध्ये बसले. त्यावेळी फिर्यादी यांच्या मुलाने बसमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट कुठे आहे, असे बसच्या क्लिनरला विचारले.

त्या कारणावरून बसचा सेकंड ड्रायव्हर आणि क्लिनर या दोघांनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी फिर्यादी यांना देखील शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. क्लिनरने गाडीतील काठीने फिर्यादी यांच्या कपाळावर मारून गंभीर दुखापत केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.