Pune – जमिनीच्या वादातून एकाचा खून ; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेवारस प्रेताचा पाण्यात बुडून नाही तर जमिनीच्या वादातून खून झाल्याचे गुव्हे शाखेच्या पथकाने खोलवर तपास करून उघडकीस आणले आहे. 29 ऑगस्टला हा वडगाव बांडे येथे हा खून झाला होता. बाळासाहेब सोनबा मुरकुटे( वय 55 रा. शिरसवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून योगेश दत्तात्रय मुरकुटे व भाऊसाहेब बाळासाहेब सर्जेराव मावळदकर अशी यातील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरातून 29 ऑगस्टला बाळासाहेब सोनबा मुरकुटे नावाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची त्यांच्या नातेवाईकांनी , शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर 1 सप्टेंबरला सकाळी 10 च्या सुमारास मांडवणगणफराटा गावात भिमा नदीपात्रात हनुमंत नामदेव फराटे यांना  प्रेत आढळून आले होते. त्यांना याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते. ते प्रेत पोस्टमार्टम केल्यानंतर हा मृत्यु पाण्यात बुडून झाला असल्याचे समोर आले. हे बेवारस प्रेत शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे दाखल असणा-या बेपत्ता तक्रारीतील बाळासाहेब मरकुटे यांच्याशी मिळतेजुळते असल्याचे आढळून आल्याने प्रेताचे फोटो आणि वस्तू पाहून ते प्रेत बाळासाहेब मुरकुटे यांचेच असल्याचे ओळखले.

बाळासाहेब मुरकुटे हे शिवाजीनगर कोर्टात आलेले असताना त्यांचे प्रेत मांडवणगणफराटा येथील भिमा नदीपात्रात कसे पोहोचले यामुळे संशय निर्माण झाल्याने पुणे ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नातेवाईकांकडे तपास सुरू केला. तपासादरम्यान योगेश दत्तात्रय मुरकुटे व भाऊसाहेब बाळासाहेब सर्जेराव मावळदकर यांच्याशी बाळासाहेब मुरकुटे यांचा शिसरवडी येथील जमीनीवरून शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल असल्याची माहीती मिळाली .
तसेच स्थानिक गुव्हे शाखेच्या पथकास खब-यामार्फत जमीनीच्या वादातूनच योगेश मुरकुटे व भाऊसाहेब माळवदकर यांनीच बाळासाहेब मुरकुटे यांचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे योगेश व भाऊसाहेब यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला असता त्या दोघांनीच मिळून बाळासाहेब यांचा खुन केल्याचे त्यांनी कबुल केले.

शिसरवडी येथील शेतीच्या कारणावरून त्यांच्यात वाद होते. बाळासाहेब यांना वेळोवेळी विनंती करून देखील ते केस मागे घेत नव्हते. म्हणून त्यांना 29 ऑगस्टला शिवाजीनगर कोर्टातील तारीख झाल्यानंतर योगेश व भाऊसाहेब यांनी जमीनीचा वाद बसवून मिटवू असा बहाणा करून बाळासाहेब मुरकुटे यांना त्यांच्याकडील सेलेरियो गाडीत बसवून लोणीकंद माथ्याजवळ व वडगाव बांडे या दोन ठिकाणी नेऊन अती दारू पाजली. व त्यांना मारहाण करून वडगाव बांडे येथील भिमा नदीच्या पात्रात पुलावरून ढकलून देवून त्याचा खुन केला होता.

शिरूर पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. बाळासाहेब मुरकुटे यांचा मृत्यु हा पाण्यात बुडून झालेला असल्यामुळे सुरवातीस अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबत खोलवर तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.