Pimpri : तीन दिवसांनी पाणीकपात वाढविण्याबाबत फेरविचार करणार – आयुक्त हर्डीकर 

धरणात 40 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पवना धरणात आजमितीला मृतसाठ्यासह 40 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचा अंदाज घेऊन 1 जुलै रोजी पाणीकपात वाढविण्याबाबत फेरविचार केला जाईल. पावसाने ओढ दिल्यास एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणी कपात करावी लागेल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी)सांगितले. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आज अखेर पवना धरणात केवळ 13.38 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 40 दिवस पुरेल एवढा हा पाणीसाठा असून आजपर्यंतचा सर्वांत कमी 13 टक्के पाणीसाठा यंदा धरणात राहिला आहे.

पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला मृतसाठ्यासह 40 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा ब-यापैकी आहे. मात्र, आणखीन पाणी कपात टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. गाड्या धुणे, उद्यानासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करण्यात येऊ नये”.

‘सध्या तरी पाणीकपात करण्याबाबतचा कोणताही विचार नाही. परंतु, पावसाचा अंदाज घेऊन 1 जुलै रोजी पाणीकपात वाढविण्याबाबत फेरविचार केला जाईल. पावसाने ओढ दिल्यास एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणी कपात करावी लागेल’, असेही त्यांनी सांगितले.

पवना धरण परिसरात 98 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला 290 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद आहे. त्या तुलनेत यंदा अत्यंत कमी पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.