Narayangoan : ‘बिबट प्रजनन नियंत्रण धोरण लागू करा’- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

एमपीसी न्यूज : नारायणगाव येथे जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर (Narayangoan) तालुक्यातील मानवी वस्तीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांची दखल घेऊन केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ‘बिबट प्रजनन नियंत्रण धोरण’ तयार करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे केली.

दोन दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील आळे येथील शिवांश भुजबळ(Narayangoan ) या ४ वर्षाच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत खासदार डॉ. कोल्हे यांनी आज केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनाही पत्र पाठवून बिबट प्रजनन नियंत्रणासाठी धोरण आणण्याची मागणी केली. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या ४ तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून मानवी वस्तीत शिरुन ग्रामस्थ व पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले होत असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी लोकसभेत ‘बिबट प्रजनन नियंत्रण धोरण’ आणण्याची मागणी केली होती. परंतु केंद्रीय वन मंत्रालयाने या संदर्भात काहीच कार्यवाही केली नाही, यांची आठवण खासदार डॉ. कोल्हे यांनी या पत्रात करुन दिली आहे.

Charholi : वाघेश्वर मंदिर परिसरात होणार ‘परंपरा-संस्कृती जतन’

त्याचबरोबर राज्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनाही पत्र पाठवून राज्य शासनाच्या माध्यमातून बिबट प्रजनन नियंत्रणासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

बिबट्यांचे संवर्धन झाले पाहिजे याबाबत दुमत नसले तरी मानवी जीवनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडले असून या चारही तालुक्यातील जवळपास बहुतेक गावात बिबट्यांचे अस्तित्व असून घराच्या आवारात काम करणाऱ्या महिला, खेळणारी मुलं व शेतीत काम करणारे शेतकरी बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, बिबट प्रजनन नियंत्रण धोरणासाठी आपण आग्रही असून येत्या संसद अधिवेशनात पुन्हा एकदा आपण या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.