Nashik News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे नाशिककरांना मिळणार स्वस्तात वैद्यकीय सुविधा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज : नाशिक मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सूरू करण्यात येणार आहे. 

राज्यातील सर्वाधिक खाटा असताना आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी, नाशिकच्या पालकमंत्र्यानी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यानी या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे नाशिककरांना स्वस्तात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. नाशिक महानगर पालिकेने यापूर्वीच याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता होती अशी खंत नाशिककर व्यक्त करत आहेत.

नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन केले आहे. आरोग्य विभागाच्या दृष्टीने राज्यात सर्वाधिक खाटा असलेले नाशिक जिल्हा रुग्णालय असताना तसेच महापालिकेच्या रुग्णालयाचे बेड खासगी वैद्यकीय महाविद्यालय वापरत असताना सरकार ही सुविधा वापरत नव्हते.

या महाविद्यालया बाबत बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की मुंबईसारख्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांचा विकास व आधुनिकीकरण जागेअभावी मर्यादा आल्या असल्याने त्याला पर्याय म्हणून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देऊ शकेल असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे विकसित करता येणे शक्य आहे.

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त असणार आहे. यात 100 विदयार्थी  प्रवेश क्षमतेचे नविन वैदयकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच 15 विषयांमध्ये एकूण 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नविन जागा निर्माण करण्यास मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली आहे.

त्यामुळे आम्ही राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी रोल मॉडेल म्हणून विकसित करू असा विश्वास  भुजबळ यांनी व्यक्त केला. प्रस्तावित वैदयकीय महाविद्यालय व त्यास  संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे रु. 627.62 कोटी इतका खर्च अपेक्षित आहेत.

याबाबत माहिती देताना  भुजबळ म्हणाले की  नाशिक हा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई-पुणे खालोखाल तिसरा मोठा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात ७ आदिवासी तालुके असून एकूण लोकसंख्येच्या २३% आदिवासी लोकसंख्या आहे त्यामुळे जनहिताचा विचार करता या मेडिकल कॉलेजची गरज भासत होती. मेडिकल कॉलेज झाले पाहिजे ही नाशिककरांची गेले अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मी सातत्याने यासाठी प्रयत्न करत होतो आज मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. प्रस्तावित वैदयकीय महाविद्यालय व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयाने नाशिक च्या वैद्यकीय सुविधांमध्ये  भर पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.