NatWest series final: बरोबर 18 वर्षापूर्वी भारताने मिळवला होता इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

NatWest series final: Exactly 18 years ago, India achieved a historic victory over England 'दादा'ने टी-शर्ट काढून आनंद साजरा केला होता

एमपीसी न्यूज – क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 325 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचे पाच महत्त्वाचे खेळाडू स्वस्तात पवेलीयन मध्ये परतले होते. भारताने युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या दमदार भागीदारीच्या जीवावर 3 चेंडू शिल्लक असताना 8 विकेट गमावून 326 धावा केल्या आणि सामन्यासह विजेतेपद जिंकले.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखाली नव्या दमाची भारतीय टिम 2000 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. या नॅटवेस्ट मालिकेच्या शेवटच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना, सलामीवीर मार्कस ट्रेस्‍कॉथीक (109) आणि कर्णधार नासिर हुसेन (115) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 5 बाद 325 धावांचा डोंगर उभा केला होता.

इंग्लंडने उभारलेल्या 325 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या  भारतीय संघाचे  पाच महत्त्वाचे खेळाडू स्वस्तात तंबूत परतले. केवळ कर्णधार गांगुलीने 60 धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. पण पाच गडी बाद झाल्यावर मैदानात आलेल्या मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग या दोन नव्या दमाच्या फलंदाजांनी अनुक्रमे (नाबाद 87) व (69) धावांची निर्णायक खेऴी केली. शेवटी 3 चेंडू व दोन विकेट शिल्लक असताना भारताने  ऐतिहासिक विजय मिळवत सामन्यासह नॅटवेस्ट मालिका जिंकली होती.

या विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून हवेत फिरवत विजय साजरा केला, तो क्षणही कायम स्मरणात राहिला. गांगुलीने आपला टी-शर्ट काढून अँड्र्यू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर दिले होते. कारण त्याच वर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध वन डे सामना जिंकल्यावर फ्लिंटॉफने आपला टी-शर्ट हवेत भिरकावला होता.

बीसीसीआय आणि आयसीसी ने या सामन्याच्या आठवणीला उजाळा देत ट्विटर वर व्हिडिओ शेअर केला आहे.

मोहम्मद कैफच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या या सामन्याच्या आठवणींना त्याने उजाळा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.