Nawab Malik Arrest : राजकीय वर्तुळाला धक्का! इडीच्या आठ तास चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक

एमपीसी न्यूज – तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात इडी चौकशी आणि अटकेच्या उलटसूलट चर्चेचे वादळ पुन्हा घोंगावायला लागले आहे. मनी लाॅंन्ड्रींग प्रकरणी मंत्री मलिक यांना अटक करण्यात आली आहे. इडी लिस्टवर आणखी कोण यावरून राजकीय वादंग रंगले असताना मलिकांना झालेली अटक राजकीय वर्तुळाला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना इडीने रडावर घेत त्यांची आज चौकशी सुरू केली. ही कारवाई सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी सुरू झाली त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मंत्री मलिक सकाळी सातच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते.

दरम्यान, आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. इडीच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्टवादीच्या गोटातील मंत्रीपदावरील व्यक्तीची ही दुसरी अटक असून याआधी राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांना सुद्धा मनी लाॅन्ड्रींग प्रकरणी अटक झाली आहे.

नवाब मलिक यांना अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

डाॅन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील अवैध मालमत्ता आणि संपत्ती यांच्याशी संबंधीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी इडीच्या रडारवर होते. त्यामुळे काही दिवसांपासूनच मुंबई शहर आणि लगतच्या परिसरात ईडीने छापेमारी करण्यास सुरूवात केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर सुरू झालेली ही छापेमारी कोणत्या नेत्यांना अडचणीत आणणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान आज सकाळी इडीने मंत्री नवाब मलिक यांच्या घरी छापेमारी करत अवघ्या काही तासांच्या अवधीत मनी लाॅंन्ड्रींग प्रकरणी त्यांना अटक केली. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांच्या सहभागाचे पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.