NCP : सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रवादीने केलेल्या कामाचा अभिमान – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आज स्थापन होऊन 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 23 व्या वर्षांत पदार्पण करत असताना आम्हाला गेल्या 22 वर्षांत पक्षाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेले निर्णय, विकासाची कामे व सर्वसधर्म समभावाची जोपासना करत केलेल्या वाटचालीचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, 1999 साली राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या दुरदृष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तीचा विकास ही भूमिका पक्षाच्या स्थापनेपासून जोपासण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्याचा विकास, नवनविन संकल्पना राबवितानाच शेतकर्‍यांच्या विकासाला महत्त्व दिले आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दुरदृष्टीमुळे झाला आहे. महापालिकेतील पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात शहराची दैदिप्यमान वाटचाल झाली. रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, स्वच्छता, पर्यावरण या बाबींना महत्त्व देतानाच सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे प्रश्न सोडविण्यात आम्हाला यश आले.

राज्यपातळीवर (NCP) काम करताना पक्षाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेण्यात आले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे विकसीत राज्य म्हणून दर्जा मिळवून देण्यात राष्ट्रवादीचाच मोठा हातभार आहे. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी घेतलेल्या निर्णयामुळे करोनावर मात करणे शक्य झाल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले. एका बाजूला सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष नागरिकांसाठी कार्यरत असतानाही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून फेसशिल्ड, सॅनिटायझर, मास्क वाटप, पालकत्व हरपलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, सामाजिक संस्थांना अ‍ॅम्ब्युलन्स वाटप, गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप यासारखे उपक्रम घेऊन समाजातील शेवटच्या घटकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न पक्षाने केला.

कोरोना काळात मदत करताना ट्रस्टच्या माध्यमातून अतिवृष्टी, दुष्काळामुळे खचलेल्या शेतकर्‍यांनाही मदत करण्यात आली. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना संगणक वाटपासारखे उपक्रम राबवून तरुणांना शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्यात आल्याचे गव्हाणे म्हणाले.

आगामी काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊन शासनाच्या माध्यमातून जलद गतीने विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून सर्वसामान्यांचा विकास हाच धागा पकडून राष्ट्रवादीची वाटचाल कायम राहणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.

आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला सर्वाधिक यश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवार यांच्याकडील दुरदृष्टी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली कामांची धउाडी याद्वारेच विकास साध्य होऊ शकतो, याची खात्री आता सर्वांना पटली आहे. येत्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीलाच सर्वाधिक यश मिळेल, असा दावाही गव्हाणे यांनी यावेळी बोलताना केला. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याने येत्या महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होतील, याबाबत आपल्याला खात्री आहे.

Pimpri News : महापालिका माध्यमिक शाळांसाठी 140 शिक्षकांची मानधनावर करणार नेमणूक

महागाईवरून केंद्रावर टीका

सध्या संपूर्ण देशभर महागाईचा भडका उडाला आहे. मात्र, केंद्रातील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून जाती-धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्याच्या हेतून असे मुद्दे निर्माण केले जात असल्याचा आरोप गव्हाणे यांनी यावेळी केला. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

राष्ट्रवादीच्या  (NCP) 23 व्या वर्धापन दिनानिमित्त खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन करण्यात आले. तसेच शहरातील 46 प्रभागांमध्ये प्रत्येक घरावर झेंडा व स्टिकर लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, पर्यावरण विषयक जागृती, नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, महिला सेलच्या माध्यमातून महिला बचत गट योजना व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबिर, सुशिक्षित बेरोजगार अभियान, डांगे चौक येथे महागाई विरोधात आंदोलन, तीनही विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिर, 46 प्रभागांमध्ये डोळे तपासणी शिबर तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तीनही विधानसभा मतदारसंघात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच दि. 9 जून ते 23 जून या कालावधीत सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती अजित गव्हाणे यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.