Pimpri News : निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून हद्दपार करणार – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका कधीही जाहीर केल्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीसाठी सज्ज आहे. गेल्या पाच वर्षांत शहराची अधोगती करणार्‍या भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाला महापालिकेतील सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभरात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार हे निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अजित गव्हाणे यांनी आपली प्रतिक्रीया देताना भाजपला सत्तेतून हद्दपार करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

याबाबत गव्हाणे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला आहे. गतवेळी खोटा प्रचार करून सत्ता पदरात पाडून घेणार्‍या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा गेल्या पाच वर्षांत उघड झाला आहे. खंडणीखोरी आणि लाचखोरीमुळे पिंपरी-चिंचवड शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला. मात्र कारभार भय आणि भ्रष्टाचार युक्त केला हे जनतेपासून लपून राहिलेले नाही.

सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या पैशांच्या लुटीतून स्वत:ची घरे भरणार्‍या भाजपच्या नेत्यांना यावेळच्या निवडणुकीत शहरवासिय धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. महापालिका निवडणुकीतसाठी राष्ट्रवादीच्या बुथ कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक सज्ज आहेत. शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध आहे. शहराच्या विकासाचे ‘व्हिजन’ केवळ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे शहरातील जनता भ्रष्टाचारी भाजपला सत्तेतून हद्दपार करून राष्ट्रवादीला पुन्हा एकदा संधी देईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.