Pimpri News : नालेसफाईच्या कामांना गती द्या, पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या; आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – संभाव्य पूर परिस्थितीतील आपत्तीकाळात कोणतीही घटना घडल्यास त्याठिकाणी संबधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून समन्वयाने परिस्थिती हाताळावी. नालेसफाईच्या कामांना गती द्यावी. पाणी कोठेही तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. नदीकाठी असणा-या लोकवस्तीत पाणी शिरण्याच्या घटनांवर लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आज (बुधवारी) प्रशासनाला दिले.

पूर आपत्ती व्यवस्थापन तसेच पूर नियंत्रण उपाययोजनांसंबधी आयुक्त राजेश पाटील यांनी बैठक बोलावली होती. बैठकीत पूर आपत्ती व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण कृती आराखड्याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली तसेच या आराखड्यानुसार विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा आणि नियोजन याबद्दल माहिती घेण्यात आली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये महापालिका, पोलीस, वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी, एनडीआरएफ, आपत्ती काळात सेवा देणा-या शहरातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सर्पमित्र यांच्यासमवेत आज संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, संदेश चव्हाण, संजय खाबडे, अशोक भालकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्यलेखापरीक्षक प्रमोद भोसले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, उप आयुक्त सुभाष इंगळे, अजय चारठाणकर, मनोज लोणकर, सचिन ढोले, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, प्रशांत जोशी, सुषमा शिंदे, बाळासाहेब खांडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, वायसीएमचे डॉ हर्शल पांडवे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, रविकिरण घोडके, जलनि:स्सारण, स्थापत्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, क्षेत्रीय कार्यालय आदी विभांगाच्या विभागप्रमुखांसह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) चे निरीक्षक सर्वेशकुमार उपाध्याय, उपनिरीक्षक अजयकुमार यादव, आपत्ती काळात सेवा देणा-या शहरातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सर्पमित्र आदी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले यांनी उपस्थित अधिका-यांना आदेश व सूचना दिल्या. पूर परिस्थितीत कमी कालावधीत घटनास्थळावर पोहोचून योग्य निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी. पूर परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पाऊस पडत असताना पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झाल्यांनतर लगेचच सर्व यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे आहे. आपत्ती काळात कोणत्याही गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करून नागरिकांमध्येही त्याबाबत जनजागृती करावी.

नालेसफाईच्या कामांना गती द्यावी. पाणी कोठेही तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. नदीकाठी असणा-या लोकवस्तीत पाणी शिरण्याच्या घटनांवर लक्ष ठेवावे. दुर्घटना टाळण्यासाठी सातत्याने या भागाची पाहणी करणे आवश्यक असून पूरबाधित व्यक्तींसाठी अन्न, निवास आदी सुविधांसह सर्व आवश्यक असणा-या साधनसामुग्रीची पूर्वव्यवस्था करावी, असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले. ज्या भागात नेहमी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उदभवते, यासाठी तेथील नागरिकांना या परिस्थितीला हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे, आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्यावत ठेवावेत, धोकादायक वृक्षांची वेळेत छाटणी करावी, नालेसफाईच्या कामांना गती द्यावी आदी सूचनादेखील आयुक्त पाटील यांनी यावेळी दिल्या.

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफचे दल सज्ज

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफचे दल सज्ज असून अवघ्या काही मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचून रेस्क्यू साठी आमचे दल तयार असेल, असे एनडीआरएफचे निरीक्षक सर्वेशकुमार उपाध्याय यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या टीम आवश्यक सर्व साधनसामग्रीसह सज्ज आहेत. अगदी काही मिनिटांत घटनास्थळावर आमचे दल पोहोचले जाईल. 14 टीम पुण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफकडे पुण्यासाठी 97 बोटी तैनात आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.