New Delhi : निर्भयाला अखेर सव्वासात वर्षांनी न्याय, चारही गुन्हेगारांना फासावर लटकवले!

एमपीसी न्यूज : दिल्लीतील निर्भयाला अखेर सात वर्षे तीन महिन्यांनी न्याय मिळाला. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आज ( शुक्रवारी) पहाटे  5.3० वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आले.  न्यायालयाने या गुन्हेगारांच्या सर्व याचिका फेटाळल्यानंतर त्यांच्या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला होता.  दरम्यान, या गुन्हेगारांना फाशी दिल्यानंतर ‘माझ्या मुलीला न्याय मिळाला’, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.

मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंग, अशी फासावर लटकावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. 2012 मध्ये दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना घडली होती. इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या निर्भयावर सामूहिक बलात्कारून करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.  या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. तसेच संपूर्ण देशातील जनतेने या  घटनेचा निषेध नोंदवून गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी केली होती.

या प्रकरणातील आरोपींना आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. त्यांचे मृतदेह 6 वाजून 20 मिनिटांनी फासावरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून चौघांनाही मृत घोषित केले. चौघांचेही शवविच्छेदन दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात करण्यात येणार असून त्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

2013 मध्ये या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 2014 मध्ये उच्च न्यायालायने आणि  2017 मध्ये सर्वोच्च न्यायालया  न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, या प्रकरणातील  एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी राम  सिंह याने तिहार  कारागृहात आत्महत्या केली होती. त्यामुळे उर्वरित चार आरोपींना आज फासावर लटकवण्यात आले.

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींची फाशी टाळण्यासाठी त्यांच्या वकिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. रात्री हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वात शेवटचा प्रयत्न म्हणून दोषींचे वकील ए पी सिंग यांनी मध्य रात्रीनंतर अडीच वाजता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा दाद मागितली. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.