New Delhi: देशात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पाच दिवसांवरून 12 दिवसांवर तर राज्यात 8 दिवसांवर

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याची आशादायक बातमी हाती आली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाच्या दुपटीकरणाचा वेग पाच दिवस होता, तो आता 12 दिवसांपर्यंत लांबविण्यात भारताला यश आले आहे. महाराष्ट्रात मात्र अजून कोरोना संसर्ग दुपटीचा वेग आठ दिवसांचा आहे. ‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटने ही माहिती दिली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला पाच दिवसांचा कालावधी लागत होता. 11 एप्रिलच्या सुमारास कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठीचा कालावधी सात दिवसांपर्यंत वाढला आणि सध्या हा कालावधी 12 दिवसांपर्यंत वाढला आहे. भारतात एक एप्रिलला कोरोनाबाधितांची संख्या 1998 म्हणजे जवळपास दोन हजार होती. 24 एप्रिलपर्यंत ही संख्या 24 हजारच्या पुढे गेली आहे. म्हणजेच 24 दिवसांत भारतातील रुग्णसंख्या तब्बल 12 पटींनी वाढली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आठ दिवसांत दुपटीने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तमिळनाडू राज्यात हा कालावधी 15.5 दिवसांचा आहे. कोरोना संसर्ग वाढीचा महाराष्ट्रातील वेग काही प्रमाणात मंदावला असला तरी चिंताजनक आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी सध्या राज्याच्या बरोबरीतच आहे. मार्चमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागत होता. तो एप्रिलच्या सुरूवातीला पाच दिवसांचा झाला. 10 तारखेनंतर तो थोडा मंदावला. त्यानंतर 16 तारखेला रुग्णसंख्या दुप्पट झाली. म्हणजे त्यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागला. त्या दिवशीची रुग्णसंख्या 24 एप्रिलला दुप्पट झाली म्हणजेच त्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागल्याचे पहायला मिळत आहे. म्हणजेच पुण्यात एप्रिलच्या सुरूवातीला दुपटीकरणासाठी लागणारा पाच दिवसांचा कालावधी तीन आठवड्यांनंतर आठ दिवसांपर्यंत वाढला आहे. तरी देखील कोरोना संसर्ग वाढीचा हा वेग आणखी मंदावण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागलेला कालावधी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.