New Delhi: राष्ट्रपती भवनाच्या आवारात कोरोना विषाणूचा प्रवेश?, 100 कुटुंबांचे विलगीकरण

एमपीसी न्यूज – भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानाच्या आवारात राहणाऱ्या एका व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संशयित व्यक्ती ही राष्ट्रपती भवन परिसरात काम करते. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपती भवनाच्या आवारातील त्या विशिष्ट परिसरातील जवळपास 100 कुटुंबांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कुटुंब राहते, त्या भागात मात्र कोरोनाचा कुठलाही धोका पोहचलेला नाही. राष्ट्रपती भवनाचा परिसर हा शेकडो एकरांवर विस्तारलेला आहे. याला प्रेसिडेन्शियल इस्टेट असे म्हटले जाते. या संपूर्ण परिसराची देखभाल करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्मचारी या परिसरातच राहतात. त्यांच्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून त्या परिसरातल्या 100 कुटुंबांना सेल्फ क्वारंटाईन करण्यात आले आहे, असे राष्ट्रपती भवनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. लखनौमध्ये तिच्या पार्टीत हजर असलेले भाजपचे खासदार दुष्यंत सिंह हे नंतर खासदारांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपतींना भेटले होते. त्याचवेळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, राष्ट्रपतींनी खबरदारी म्हणून प्रोटोकॉलचं पालन करत विलगीकरण केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राज्यपालांसोबत होणाऱ्या काही भेटीगाठीही व्हिडिओ कॉन्फरन्सच्याच माध्यमातून होत आहेत. गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा कोरोनाचे कनेक्शन राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचले आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ देशात सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण दिल्लीत आहेत. दिल्लीत आत्तापर्यंत 2081 कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर 47 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत 76 हॉटस्पॉट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निश्चित केले आहेत. यातील एका सील केलेल्या परिसरात दोन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील 26 जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात आता देशातल्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती भवनातही कोरोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.