Chinchwad : संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांसाठी प्रशासनाने त्रिसूत्री राबवूनही महिनाभरात पाच हजार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – विनाकारण घराबाहेर वाहनांवरून फिरता येऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकांना केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल देण्याच्या सूचना दिल्या. तरीही काहीजण आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून फिरताना आढळून आले. म्हणून पोलिसांनी वाहने जप्त केली. तरीही नागरिक रस्त्यावर दिसतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना भावनिक साद, शाब्दिक जोडे आणि काठीचा प्रसाद देऊन सांगायला सुरुवात केली. पण, तरीही नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांकडून आता सरळ गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील महिन्याभरात पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल पाच हजार 156 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोना या साथीच्या आजाराचे रुग्ण मिळू लागल्याने सामुहिक संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने 21 मार्चपासून टाळेबंदी जाहीर केली. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात सरकारने संचारबंदीचेही आदेश दिले. तर, 25 मार्चपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हे 21 दिवस पूर्ण होतात न होतात तोच पुन्हा आणखी 19 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला. त्यामुळे संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश आता 3 मेपर्यंत कायम राहिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. दुकाने बंद करण्याबाबत पोलिसांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले. मात्र, त्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवल्याने त्यांच्यावर प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केले जात आहेत.

संचारबंदीच्या काळात अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सर्व खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई केली. इतर नागरिकांना विनाकारण घराबाहेर वाहनांवरून फिरता येऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकांना केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल देण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या. तरीही काहीजण आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून मजेत फिरताना आढळून आले.

या वाहन चालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी त्यांची वाहने जप्त करायला सुरुवात केली. शेकडो वाहने जप्त केली. तरीही नागरिक रस्त्यावर दिसतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ‘बाबांनो, तुमच्या, आमच्या, कुटुंबियांच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कृपया घरातच बसा’ अशी भावनिक साद घातली.

अनेक वेळेला ‘मी गाढव आहे. मी प्रशासनाचे नियम पाळत नाही. त्यामुळे मी उच्च शिक्षित गाढव आहे’ अशा आशयाचे बोर्ड हातात देऊन फोटोसेशन करत अनेकांना शाब्दिक जोडे देखील हाणले. प्रसंगी अंगावर वळ उठेपर्यंत काठीचा प्रसाद देऊन सांगायला सुरुवात केली. पण ऐकतील ते नागरिक कसले. त्यामुळे पोलिसांकडून आता सरळ गुन्हे दाखल केले जात आहेत.

प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दुकान सुरू ठेवणे, संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणारे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पेट्रोल न मिळणे, वाहने जप्त करणे, गुन्हे दाखल करणे ती त्रिसूत्री प्रशासनाने अवलंबली.

तरीही गेल्या 21 मार्च ते 20 एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत पोलिसांनी पाच हजार 156 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. लॉकडाऊन आणखी किमान 13 दिवस शिल्लक आहे. गुन्हे दाखल होण्याचा हा आकडा आणखी वाढणार की आहे तेवढाच राहणार? हे पिंपरी-चिंचवडकरांच्या हातात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.