Pune : भवानी पेठेला कोरोनाचा विळखा, सर्वाधिक 157 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. दाटीवाटीने असलेल्या भवानी पेठेला तर कोरोनाचा विळखा बसला आहे. येथे शहरातील सर्वाधिक 157 रुग्ण आहेत. त्याखालोखाल ढोले पाटील रोड परिसरात 96 तर, कसबा – विश्रामबागवाडा भागांत 93 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती महापालिका प्रशासनकडून देण्यात आली.

पुणे महापालिका हद्दीत दाटलोकवस्ती असलेल्या भागात कोरोनाचे संक्रमण मोठ्याप्रमाणात झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भवानी पेठेला बसला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वाधिक 157 रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण येथे आहेत. त्याखालोखाल ढोले पाटील रोड परिसरात 96 तर, कसबा – विश्रामबागवाडा भागांत 93 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद महापालिकेकडे आहे.

या शिवाय पुण्यातील येरवडा – कळस – धानोरी येथे 67, शिवाजीनगर – घोलेरोड येथे 59, धनकवडी – सहकारनगरला 33, वानवडी – रामटेकडी येथे 30, हडपसर – मुंढवा परिसरात 24, बिबवेवाडीत 23, कोंढवा – येवलेवाडीला 10, सिंहगड रोड येथे 8, वारजे – कर्वेनगर 8, औंध – बाणेर 2, कोथरूड – बावधन 1 अशी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे. पुणे जिल्ह्यात 35 कोरोना रुग्ण असल्याची नोंद  असल्याची माहिती पुणे महापालिकेतर्फे देण्यात आली.

ससून, नायडू ‘हाऊसफुल्ल’

ससून रुग्णालयात १००, नायडू रुग्णालयात १२०, तर भारती हॉस्पिटलमध्ये १३५ बेड्स आयसोलेशनची सुविधा उपलब्ध आहे. या शिवाय बोपोडी येथील महापालिकेच्या दवाखान्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ससून, नायडूसह भारती हॉस्पिटलचीही कॅपिसीटी संपली आहे. त्यामुळे आता ससून, नायडू आणि भारती हॉस्पिटल फुल्ल झाले आहे.

 

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण महापालिका हद्दीतील परिसर सील करण्यात आला आहे. त्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. पोलिसांनीही त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काही कालावधीत सूट देण्यात आली आहे. मात्र, कडक अंमलबजावणीमुळे अतिउत्साही नागरिकांना आता काही प्रमाणात आळा बसला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत 3 मेपर्यंत पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.