New Delhi : आज मध्यरात्री बारापासून २१ दिवसांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज : जनता कर्फ्यूला प्रत्येक भारतीयांनी सफल केले. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा सगळे एकत्र येतात हेच या माध्यमातून पाहायला मिळाले. कोरोनापासून वाचविण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे आणि घरातचं राहणे या शिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. त्यामुळे त्याचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( मंगळवारी ) केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. आज रात्री बारापासून पूर्ण देशात लोकडाऊन केले जाणार आहे. हा एकप्रकारे जनता कर्फ्यू पेक्षा जास्त कडक कर्फ्यू असेल असे, पंतप्रधानांनी सांगितले. हा कर्फ्यू २१ दिवसांचा असेल, असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोना विषाणूचे जाळे तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ महत्वाचा आहे. त्यामुळे भारताला वाचवायचे असेल तर आज मध्यरात्रीपासून कुणीही घराबाहेर पडू नये. २१ दिवसांसाठी हे बंधन असेल. देशातील प्रत्येक राज्य, जिल्हा आणि गावात हा लॉकडाऊन लागू केला जात आहे. देशातील ३२ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांसह ५६० जिल्ह्यात हा लॉकडाऊन आहे. त्यामुळे कुणीही या २१ दिवसांच्या कालावधीत घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या महामारीला रोखण्यसाठी हे करावेच लागेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉक्टर, नर्सेस व अन्य मंडळी कोरोनापासून वाचवण्यासाठी काम करीत आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत काम करीत आहेत.  त्यांच्यासाठी  प्रार्थना करा. पोलीस आणि माध्यम प्रतिनिधीसाठीही प्रार्थना करा. केंद्र आणि देशभरातील राज्य सरकारे या महामारीचा सामना करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु राहील याची सरकार काळजी घेत आहे. जीव वाचविण्यासाठी जे योग्य आहे त्याला प्राधान्य द्यावेच लागले. केंद्राने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सर्व राज्य सरकार यांनी आरोग्य विषयक बाबींनाच प्राधान्य द्यावे. अफवांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही पंतप्रधांनांनी केले. आपली काळजी घ्या , आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.