Pimpri : पालिकेचे सर्व 133 नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार केरळ पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण केरळात पूरग्रस्त परिस्तिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळवासीयांना देशभरातून मदतीचा हात दिला जात आहे. पिंपरी-चिंचवडचे सर्वच 133 नगरसेवक एका महिन्याचे मानधन केरळला मदत म्हणून देणार आहेत. नगरसेवकाला महिन्याला 15 हजार रुपये मानधन असून 133 नगरसेवकांचे 19 लाख 95 हजार रुपये होतात. ही सर्व रक्कम केरळातील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा आज (सोमवारी) आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला आहे. केरळवासीयांना मदतीची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी मदत करावी, असे आवाहन मूळचे केरळचे असलेले नगरसेवक बाबू नायर यांनी केले होते. तसेच सर्व अधिका-यांनी देखील एका दिवसाचे वेतन देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेत निवडून आलेले 128 नगरसेवक आहेत. तर, पाच स्वीकृत नगरसेवक असे एकूण 133 नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील एका नगरसेवकाला महिन्याला 15 हजार रुपये मानधन आहे. 133 नगरसेवकांचे महिन्याचे 19 लाख 95 हजार रुपये होतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.