Pimpri: भाजपचा अजब कारभार; शौचालयाच्या विषयाला बढतीची उपसूचना

एमपीसी न्यूज – स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अवलोकनाच्या प्रस्तावाला शहर अभियंत्याच्या बढतीची उपसूचना देत सत्ताधारी भाजपने अकलेचे दिवाळे काढले आहे. शौचालय बांधणीच्या प्रस्तावाला बढती देण्याची उपसूचना सुसंगत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने गदारोळ केला. भाजपने उपसूचना मंजूर करत सभाकामकाज रेटून नेले. त्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्यात केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री पुरस्कार प्राप्ती मुरलीकांत पेटकर यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात आला. त्यानंतर सभाकामकाज दुपारी सव्वा तीनपर्यंत तहकूब करण्यात आले. उपसूचनांचा घोळ सुरु असल्याने तब्बल 20 मिनिटे उशिराने सभेला सुरुवात करण्यात आली.

  • विषय पत्रिकेवरील स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अवलोकनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपने सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची उपसूचना दिली. या विषयावर बोलताना माजी महापौर मंगला कदम यांनी विसंगत उपसूचनेला हरकत घेतली. ही रितसर उपसूचना आहे का? त्याचा खुलासा करण्यात यावा. विसंगत उपसूचनेला आयुक्त मंजुरी देणार आहेत का? वाट्टेल तसे सभागृहाचे कामकाज कसे चालविले जाते.

भाजपचेच नगरसेवक म्हणतात काय चालले आहे? हे आम्हाला कळत नाही. त्यांना कारभार समजला पाहिजे. भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय घेऊ शकतात. पण, जे आहे ते योग्य पद्धतीने करा. आयुक्त ही विसंगत उपसूचना मंजूर करणार आहेत का? हे सांगावे. नाही तर आम्ही सभात्याग करु? आयुक्तांनी खुलासा करण्याची मागणी कदम यांनी केली.

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, सभागृह नेते एकनाथ पवार म्हणतात अधिकारी विरोधकांना भेटले नाहीत म्हणून विरोध करत आहेत का? म्हणजेच सत्ताधा-यांना अधिकारी भेटतात. त्यानंतरच बढतीच्या उपसूचना मंजूर करतात का? असा प्रश्न उपस्थित केला.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, आम्ही चांगले काम करत आहोत. विरोधकांना त्याची अॅलर्जी आहे. उपसूचना दिली म्हणजे आम्ही चो-या करत नाहीत. पात्र अधिका-याला बढती दिली पाहिजे. केवळ अधिकारी भेटला नाही म्हणून विरोध करतात की काय? हे लक्षात येत नाही. विरोधकांच्या देखील आम्ही उपसूचना घेतो. सभागृहात सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. सभागृह सर्वांचे आहे. नगरसेवकांनी आपले प्रश्न मांडले पाहिजेत.

  • महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी शौचालय बांधणीच्या कामाचा खुलासा केला. त्यानंतर महापौर जाधव यांनी विसंगत उपसूचनेबाबत नगरसचिव उल्हास जगताप यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले. अचानक महापौरांनी संकेत डावलत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना बोलण्यास परवानगी दिली. आयुक्तांना उपसूचना सुसंगत वाटली. तर, ते मंजूर करतील. प्रत्येक विषयाचा खुलासा केला जाणे योग्य आहे का? असे सांगत खुलासा न करता विषय मंजूर करण्याची विनंती त्यांनी केला. त्यावर महापौर जाधव यांनी उपसूचनेसह विषय मंजूर केल्याचे जाहीर केले.

त्यामुळे माजी महापौर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, मंगला कदम यांनी बोलून देण्याची मागणी केली. परंतु, महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करत कामकाज सुरुच ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत गदारोळ केला. परंतु, भाजपने गदारोळात कामकाज रेटून नेले. त्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्यात केला. त्यांनतर भाजपने आयत्यावेळेचे विषय उपसूचनेहसह मंजूर करत सभेचे कामकाज गुंडाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.