Pimpri : प्रशासन आमच्यासोबत राजकारण करत आहे; महापौर ढोरे

प्रशासनाच्या चुकीमुळेच निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नाव राहिले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका विकासकामांच्या उद्घाटने, भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रोटोकॉल’नुसार पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले पाहिजे ही आमची भूमिका आहे. आजच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकले गेले नाही. त्याची सर्वस्वी चूक प्रशासनाची आहे. आम्ही पदाधिकारी असून प्रशासन आमच्यात राजकारण करत असल्याचा आरोप महापौर उषा ढोरे यांनी केला.

महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा मुख्य उड्डाण पुलावर चढण्यास व उड्डाण पुलावरून उतरण्यासाठीचा रॅम्पचे आज लोकार्पण करण्यात आले. ‘प्रोटोकॉल’नुसार उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकणे आवश्यक होते. परंतु, नाव टाकले नाही. त्यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी आक्रमक भूमिका घेतली.

राज्यात भाजपची आणि महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर टाकले जात होते. परंतु, आता सत्ताधारी भाजपकडून मोठेपणा दाखविला जात नाही. प्रोटोकॉलचे उल्लंघन केले जात आहे. प्रोटोकॉलनुसार यापुढील निमंत्रण पत्रिकेवर अजितदादांचे नाव टाकण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करुन एकाही पदाधिका-याला खुर्चीवर बसून दिले जाणार नाही, असा इशारा साने यांनी दिला. तसेच महापौर ढोरे यांची भेट घेऊन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

याबाबत बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, ”रॅम्पच्या लोकार्पणाची निमंत्रण पत्रिका प्रशासनाने रात्री उशिरा निश्चित केली. ‘प्रोटोकॉल’नुसार पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले पाहिजे ही आमची भूमिका आहे. पालकमंत्री आमचे देखील आहेत. परंतु, आजच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकले गेले नाही. त्याची सर्वस्वी चूक प्रशासनाची आहे. आम्ही पदाधिकारी असून प्रशासन आमच्यात राजकारण करत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.