Chinchwad : एम्पायर इस्टेट येथील रॅम्प वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा मुख्य उड्डाण पुलावर चढण्यास व उड्डाण पुलावरून उतरण्यासाठीचा रॅम्प वाहतुकीसाठी आजपासून खुला करण्यात आला आहे. या रॅम्पमुळे औंध-रावेत व पुणे- मुंबई बायपासकडून येणारी वाहतूक निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्याशी जोडली जाणार आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) रॅम्पचा लोकार्पण समारंभ झाला.

या प्रकल्पासाठी एकूण 12.69 लाख रुपये खर्च आलेला असून काळेवाडी- देहू आळंदी रस्त्यावरील दोन स्वतंत्र रॅम्पची लांबी प्रत्येकी 410 मीटर व दोन स्वतंत्र रॅम्पची रुंदी प्रत्येकी 5.05 मीटर आहे. पुलावरुन खाली येणारा रॅम्प 105 मीटरचा असून पुलावर जाणारा रॅम्प 90 मीटरचा आहे. या रॅम्पमुळे पिंपरी-चिंचवड भागातील वाहतूक सुरळीत होणार आहे. औंध- रावेत व पुणे- मुंबई बायपासकडून येणारी वाहतूक निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्याशी जोडली जाणार आहे.

काळेवाडी, थेरगांव, रहाटणी या भागातील नागरिकांना महापालिकेमध्ये व निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावर येण्यासाठी सध्या पिंपरी किंवा चिंचवड भागातून यावे लागते. या नविन रॅम्प्समुळे या भागातील नागरीकांना महापालिकेमध्ये व निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावर येण्यासाठी कमी वेळ लागणार असून सुमारे 1.50 किलो मीटर अंतर कमी होणार आहे. एम्पायर इस्टेटमधील नागरिकांना काळेवाडी, थेरगांव, रहाटणी या भागात येण्यासाठी सध्या चिंचवडगांव किंवा पिंपरी भागातून यावे/ जावे लागते. नविन रॅम्पमुळे काळेवाडी, औंध, रावेत, हिंजवडीस जाण्यासाठी सोयीचे व कमी अंतराचे मार्ग उपलब्ध झाला आहे.

शहरातील दक्षिण उत्तर वाहतूक सुरळीत झाली असून हे रॅम्प वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहेत. नवीन बीआरटीएस कॉरिडॉरमुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम होण्यास मदत होणार आहे. या व्यवस्थेत दररोज एक ते दीड लाख प्रवासी अपेक्षित आहेत. निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावरील बीआरटीएस बस स्टॉपची होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. एम.एम.स्कूल चौक, शगुन चौक, पिंपरी चौक व अहिल्यादेवी होळकर चौक येथील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शितल शिंदे, शैलेश मोरे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, उपअभियंता संजय साळी, विजय भोजने, दिपक पाटील, संजय काशिद, बापु गायकवाड, रविंद्र सुर्यवंशी, सुनिल पवार, बाळासाहेब शेटे, सल्लागार मिलिंद कुलकर्णी, जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व एम्पायर इस्टेट मधील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.