IPL 2021 : बातमी IPL ची – रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व आणि हैदराबादची हराकिरी!

मेजवानी घरी बसून पाहण्याची

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी): चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळ कधीही कुठल्याही क्षणी बदलू शकतो हे माहीत असूनही आयपीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी का घेतली, यावर अनेक समालोचक, विश्लेषक मत मांडत बसले, पण रोहितला याची जराही काळजी नव्हती कारण त्याचा त्याच्या संघावर असलेला जबरदस्त विश्वास.

_MPC_DIR_MPU_II

डीकॉकच्या साथीने त्याने या मोसमातली पहिली अर्धशतकी सलामी भागीदारी नोंदवताना आपला निर्णय योग्यच होता हे चेंडू दर चेंडू (पावलोपावली) सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे असेच वाटत होते,पण कमालीची अनिश्चितता ज्या फॉरमॅटचे खास वैशिष्ट्य आहे त्या 20/20 मध्ये नेहमीच दाक्षिणात्य चित्रपटासारखे अतर्क्य असते, याची प्रचीती क्रिकेट रसिकांनी कित्येकदा अनुभवली आहेच, ती अनुभूती आज पुन्हा एकदा याची देही याची डोळा अनुभवता आली.

चांगली भागीदारी होत असतानाच रोहीत आणि डीकॉक दोघेही एकापाठोपाठ एक तंबूत परतले आणि हे कमी का काय म्हणून ईशान किशन आणि हार्दिक पंड्या हे भरवशाचे खंदे वीर पण आज स्वस्तात बाद झाले आणि मुंबई संघाला आज मोठ्या धावसंख्येचे सोपे वाटणारे लक्ष एकदमच अवघड वाटू लागले,पण अंतिम षटकात थंड डोके ठेवून खेळी करणारा पोलार्डने एक चौकार आणि तीन षटकार मारत (ते ही अचूक भुवनेश्वरच्या एका षटकात दोन लागोपाठ षटकार खेचत) कसेबसे का होईना 150 धावांचा टप्पा गाठून दिला.

आत्तापर्यंत झालेले सर्व  सामने कालचा चेन्नईचा एकतर्फी विजय सोडला तर ही धावसंख्या अगदीच कमी नव्हती, आणि मुंबईकडे राहुल चाहर, अचूक बुमराह आणि वेगवान ट्रेंट बोल्ट असे भेदक गोलंदाजही होते. त्यामुळे मुंबईच्या गोटात फारसे काळजीचे वातावरण दिसत नव्हते.

उत्तरादाखल खेळताना सनरायजर्स हैदराबादचा आक्रमक कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो ने सुरुवात धमाकेदार केली, वॉर्नरच्या तुलनेत आज बेअरस्टो फारच धुंवाधार फलंदाजी करत होता, मुंबईने 55 ची सलामी दिली होती याला प्रत्युत्तर म्हणून की काय हैदराबादने 62 धावांची सलामी दिली ज्यात जॉनीमे 43 धावा एकट्यानेच जमवल्या होत्या आणि त्याचा हा धडाका बघता आज मुंबईला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागतेय असेच वाटत असताना हैदराबाद संघाच्या फलंदाजीला नजर लागली आणि ती अशी लागली की दणदणीत विजय आज ज्याला खात्रीने मिळेल असे वाटणारा हैदराबाद संघ चक्क तेरा धावांनी पराभूत झाला.

पहिल्यांदा बेअरस्टो जम बसल्यावर सुद्धा स्वयंचीत झाला, ते श्रेय कृणाल पंड्याने मिळवले पाठोपाठ मनीष पांडे ही केवळ दोनच धावा करून बाद झाला आणि हार्दिक पंड्याने कालच्या जडेजाने केलेल्या धावचितचा रिप्ले दाखवून कर्णधाराला एका अप्रतिम फेकीवर धावबाद केले आणि हैदराबाद संघाच्या तंबूत घबराहट पसरवली या धक्क्यातून हैदराबादचा संघ सावरलाच नाही, नाही म्हणायला विजय शंकरने लागोपाठ दोन षटकार मारत ‘हमने match अभी छोडी नही है’ चा अविर्भाव दाखवला खरा, पण त्यात आवेश कमी आणि धडपडच जास्त दिसली, त्यातच हार्दिक पंड्याने आणखी एक गडी धावबाद करत चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आणि महत्वही सिद्ध केले.

अष्टपैलू म्हणून घेतलेला हार्दिक पंड्या अजूनही गोलंदाजीत त्याचे योगदान देत नसला तरी ती कमी तो अशा अफाट क्षेत्ररक्षण करून सिद्ध करत आहे.

शेवटच्या चार षटकात बुमराह आणि ट्रेंटच्या अचूक गोलंदाजीपुढे भले भले फलंदाज गडबडतात. इथे तर संघाचे शेपूटच उरले होते. दोघांच्याही अचूक गोलंदाजीने संपूर्ण संघ बाद झाला आणि एकतर्फी  विजय मिळवणार, असे वाटणारा संघ चक्क 13 धावांनी पराभूत झाला. राहुल चहरने आज सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करताना चार षटकात केवळ 19 धावा देत तीन बळी मिळवले तर ट्रेंट बोल्टने अंतिम घाव घालत तीन बळी मिळवत त्याला उत्तम साथ दिली. पोलार्डने भुवीच्या आणि मुंबईच्या डावातल्या शेवटच्या षटकात जे दोन गगनचुंबी षटकार मारले तेच दोन्ही संघाच्या विजयामधले टर्निंग पॉईंट्स ठरले, असे म्हणता येईल म्हणूनच त्यालाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

हैदराबाद संघाची हराकिरी आजच्या त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली तर रोहित शर्माचे नेतृत्व का कल्पक म्हटले आणि मानले जाते याची प्रचिती आज पुन्हा सर्वाना आली, हातातला सामना जातोय, अशी स्थिती असतानाही रोहितने क्षेत्ररक्षणातले आणि गोलंदाजतले केलेले प्रत्येक बदल या समजाला  खात्रीत बदलवत होता.

देशभर करोनाचे महासंकट थैमान घालत असताना घरी बसलेल्या समंजस आणि सुजाण नागरिकांसाठी याहून अधिक सुंदर मेजवानी असूच शकत नव्हती. ती मुंबई संघाने दिली आणि अंकतालिकेत चार गुण मिळवत अव्वल स्थान प्राप्त केले तर सनरायजर्स हैदराबादच्या गुणांची पाटी अद्यापही कोरीच राहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.