Nigadi : पोलीस चौकीत पोलीस कर्मचा-याला मारहाण; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – दुचाकी पोलीस चौकीत आणल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना प्राधिकरण पोलीस चौकीत बुधवारी (दि. 8) सकाळी दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

सोहेल निसार शेख (वय 18, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र सोनू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक एस. एल. बेबले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलीस नाईक एस. एस. बेबले प्राधिकरण पोलीस चौकीमध्ये एका गुन्ह्याची कामागपत्रे तयार करत होते. त्यावेळी सोहेल आणि त्याचा मित्र पोलीस चौकीत आले. ‘माझी गाडी का सोडत नाही’ अशी सोहेल याने बेबले यांच्याकडे विचारणा केली.

त्यावर ‘मी तुझी गाडी आणलेली नाही. तू साहेबांना भेट’ असे बेबले यांनी उत्तर दिले असता सोहेल याने बेबले यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच रस्त्यावर ढकलून दिले. यामध्ये बेबले जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोहेल याला अटक केली आहे. निगडी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.