Nigdi : मॉडर्न शैक्षणिक संकुलात रंगला दीपावली गीतोत्सव!

एमपीसी न्यूज – निगडी यमुनानगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल आणि दीपोत्सव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगरमध्ये रंगलेल्या दीपावली गीतोत्सव कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

यावेळी दीपक महाजन प्रस्तुत बहारदार मराठी-हिंदी गीतांचा अनोखा नजराणा यमुनानगर परिसरातील नागरिकांसाठी सादर झाला. यावेळी प्रसिद्ध गायक दीपक महाजन, सोनाली नांदूरकर ,अनुश्री घोरपडे आणि कुमार करंदीकर या कलाकारांनी सादर केलेल्या मराठी, हिंदी गीतांमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. विविध बहारदार गाण्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली तर अनेक गाण्यांना रसिकांनी ठेका धरला.

प्रथम कुमार करंदीकर आणि अनुश्री घोरपडे यांच्या ‘काकड आरती’ आणि ‘गजानना श्री गणराया’ या भक्ती गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोनाली नांदूरकर व कुमार करंदीकर यांनी गायिलेल्या ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘धुंदी कळ्याना’, ‘आओ हुजूर’, ‘एक मै और एक तू’ या गाण्यांना रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.तर दीपक महाजन यांनी गायलेल्या ‘गुलाबी आँखे’, ‘बेखुदी मे सनम’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ओ मेरी जोहराजबी’ या गाण्यांना प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ देऊन दाद दिली.

शेवटी सादर झालेल्या ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’ आणि ‘झिंगाट’ या गाण्याला रसिकांनी शिट्या वाजवून प्रतिसाद दिला. मराठी, हिंदी गाण्यांबरोबरच तबला, ढोलकी, की-बोर्ड, व्हायोलिन अशी वाद्य कलाकारांनी लीलया हाताळली. यावेळी निवेदिका नीलम बेंडे यांनी आपल्या खुमासदार निवेदनातून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

दरम्यानच्या काळात नवनिर्वाचित आमदार महेशदादा लांडगे यांचा नागरी सत्कार आयोजकाकडून करण्यात आला. याप्रसंगी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, कमल घोलप, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह शरद इनामदार,  प्राचार्य सतीश गवळी, राजीव कुटे, गौरी सावंत,  तसेच नंदकुमार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.