Nigdi News: ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित ‘सकारात्मक अनुभवांची लेखन स्पर्धे’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी सकारात्मक रहावे यासाठी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी आयोजित केलेल्या ‘सकारात्मक अनुभवांची लेखन या स्पर्धा’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल 225 जणांनी लेख लिहिले. सर्वांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्त्री आणि पुरुष गटांमध्ये एकूण 10 आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. निवडक अनुभव दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

याबाबतची माहिती देताना नगरसेवक अमित गावडे म्हणाले, आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या-वाईट अनुभवांची शिदोरी पाठिशी घेऊनच आपण पुढे जात असतो. वाईट आठवणी विसरुन आणि चांगल्या अनुभवांना मनाशी कवटाळून आपण वाटचाल करत राहतो. कोरोनाच्या कठीण काळात आपण सगळो तरलो ते सकारात्मक अनुभवांच्या आणि चांगल्या गोष्टींच्या जोरावरच, भविष्यातही सकारात्मक मानसिकता, सकारात्मक आठवणी आणि सकारात्मक विचार या सर्वांची सर्वांधिक आवश्यकता असणार आहे.

त्यासाठी सकारात्मक अनुभवांची लेखन स्पर्धा घेण्यात आली. 60 वर्षांपुढील महिला-पुरुषांसाठी ही स्पर्धा घेतली गेली. आत्तापर्यंत आलेले अनुभव, त्यातील चांगले, सकारात्मक आणि लक्षात राहण्यासारखे अनुभव लिहिले आहेत. तब्बल 225 जणांनी लेख लिहिले. त्यात 115 महिला आणि 110 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांना सन्मानपत्र देण्यात आले. जमा झालेले निवडक अनुभव दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नगरसेवक गावडे यांनी सांगितले. स्पर्धेच्या निमित्ताने सकारात्मक लिखाण करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.