Nigdi News: पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाकरिता अजितदादा कुठे कमी पडले ? – सुनील शेळके

पिंपरी-चिंचवडकरांनो, विकासपुरुष अजितदादांची साथ का सोडली ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ( Pimpri chinchwad) शहराला विकासकामांतून खऱ्या अर्थाने चांगले रुप देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Cm Ajit Pawar) यांनी केले. आशिया ( Asia) खंडातील नियोजनबद्ध विकास झालेले शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. परंतु, मागील महापालिका निवडणुकीत चांगले काम करणा-या व्यक्तीची शहरातील नागरिकांनी साथ सोडली ही मोठी खंत मनामध्ये असल्याचे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Ncp Mla Sunil Shelke)  यांनी बोलून दाखविली. तसेच शहराचा विकास करण्यात अजितदादा कुठे कमी पडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ ( Raju Misal) यांनी संदीप कदम मेमोरियल कप क्रिकेट स्पर्धेचे (Sandeep Kadam Memorial Cup Cricket Tournament) आयोजन केले होते. निगडीतील मदनलाल धिंग्रा स्टेडियम (Madanlal Dhingra Stedium) येथे या स्पर्धा झाल्या. स्पर्धकांना शुभेच्छा देताना आमदार शेळके बोलत होते. सावंतवाडीतील शिवसेना नेते संदेश पारकर ( shivsena Leader Sandesh Parker), विवेक खोत, संदीप गराडे, सुनील गायकवाड यावेळी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, शरद पवार, अजित पवार यांना साथ देणारे अनेक निष्ठावान सहकारी शहराच्या जडणघडणीसाठी काम करत आहेत. साहेब, दादांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक अडी-अडचणींमध्ये पाठीशी उभे राहिले आहेत. दादांनी बारामतीप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरावर प्रेम केले. शहराचा कायापालट केला. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, क्रीडांगणे, उद्याने विकसित केली. भविष्याचा विचार करुन नियोजनपूर्वक शहराचा विकास केला.

आशिया खंडातील सर्वात नियोजनबद्ध विकसित शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. हे शहर पाहण्यासाठी यावे असे अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. असे असताना शहरातील नागरिकांनी दादांची साथ सोडली. शहराच्या विकासामध्ये अजितदादा कुठे कमी पडले. हा आज देखील मनाला प्रश्न पडतो. चांगले काम करणा-या व्यक्तीची पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी साथ का सोडली, असा प्रश्नही त्यांनी केला.

शहराचा विकास झाला पाहिजे. नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. शहरातील अनेक पदाधिकारी प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत आहेत. सत्ता येईल, जाईल. परंतु, अनेक निष्ठावान कार्यकर्ते साहेब, दादांच्या पाठीशी उभे आहेत. जो काम करतो. अडी-अडचणींना पाठिशी उभा राहतो, अशा व्यक्तींना साथ देण्याची आता गरज आहे.

मावळ, पिंपरी-चिंचवड दूर नाही. विकासकामांची, खिलाडूवृत्तीने स्पर्धा झाली पाहिजे. या क्रीडा स्पर्धेसारखीच राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना साथ द्यावी असे आवाहनही आमदार शेळके यांनी शहरवासीयांना केले.

मिसाळ यांनी राज्यातील क्रीडाप्रेमींना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. सुसज्ज, देखणे असे क्रिकेट स्पर्धेचे नियोजन केले आहे. खेळाडूंचा मानसन्मान केला जात आहे. राजू मिसाळ यांनी राज्यातील अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमींना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. मिसाळ तीन टर्म महापालिकेत प्रतिनिधीत्व करत आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगत शेळके यांनी मिसाळ यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.