Nigdi: पंडीत रामलाल बारेथ यांना ‘विमल-भास्कर’ पुरस्कार जाहीर; रविवारी निगडीत होणार वितरण

एमपीसी न्यूज – नंदकिशोर कल्चरल सोसायटी तर्फे देण्यात येणारा ‘विमल-भास्कर’ पुरस्कार यंदा छत्तीसगढ येथील ज्येष्ठ कथकगुरू पंडीत रामलाल बारेथ आणि मथुरादेवी बारेथ यांना जाहीर झाला आहे.

येत्या रविवारी (दि. 3) या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध नर्तक डॉ. पंडीत नंदकिशोर कपोते यांनी ही माहिती दिली.

विमल कपोते आणि भास्कर कपोते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-यांना हा ‘विमल-भास्कर’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आजवर कथकक्वीन सितारादेवी, पद्मविभुषण पंडीत बिरजू महाराज, पंडीत शाश्वती सेन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यंदा या पुरस्कारासाठी पंडीत रामलाल बारेथ आणि मथुरादेवी बारेथ यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता यमुनानगर, निगडी येथील नंदकिशोर कल्चरल सोसायटी सभागृहात होणा-या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत कथकनृत्य कार्यशाळा होणार असून पंडीत रामलाल बारेथे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.