Pimpri News : पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी घ्या – महापौर माई ढोरे

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील 5 वर्षाखालील बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापालिकेच्या सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी प्रसूतीगृह येथे बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला. शहर पोलिओ मुक्त करण्यासाठी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या पोलिओ बूथ केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा, पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शुभारंभ प्रसंगी शिक्षण समिती सभापती माधवी राजापूरे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. एस. डी. कुरुंदकर, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य प्रतिनिधी डॉक्टर राजीव कुमार जिल्हा प्रतिनिधी डॉ. चेतन खाडे, महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया आंबेडकर, डॉ. तृप्ती सागळे, रोटरियन बालाजी अय्यर, पब्लिक हेल्थ नर्स शोभा ढोले, बाबुराव घोलप महाविद्यालयाचे स्वयंसेवक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमार्फत विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक तसेच लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. महापालिकेची सर्व रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे आहेत. तर बस स्थानक आणि रेल्वे स्थानक अशा ठिकाणी ट्रांझीट लसीकरण केंद्रे आणि वीटभट्टया, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या बालकांसाठी फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. या ठिकाणी पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.