Now Sushant’s father will be legal heir: आता सुशांतचे वडीलच त्याचे कायदेशीर वारसदार

एमपीसी न्यूज – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या केसची आता सीबीआयकडून चौकशी होणार आहे. त्यानुसार सीबीआयची टीम तपासासाठी मुंबईत दाखल झाली असून या प्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. त्यानंतर सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी बुधवारी स्वतःला आपल्या मुलाचा कायदेशीर वारस असल्याचे घोषित केले आहे.

ते म्हणाले की, सुशांत हयात असताना त्याने ज्या वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि प्रोफेशनल्सला नियुक्त केले होते, त्यांचा कार्यकाळ आता संपला आहे. त्यांना सुशांतबद्दल काहीही सांगण्याचा आता अधिकार नाही. जर कोणी असे करत असेल तर त्यांना सर्वप्रथम माझी परवानगी घेणे आवश्यक आहे. सुशांतच्या कुटुंबात आता मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे.

काही वकिलांनी सुशांतने त्यांची नियुक्ती केल्याचे वक्तव्य मीडियात केले होते. त्यानंतर के. के. सिंह यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. के. के. सिंह म्हणाले की, या कथित वकिलांनी सुशांतसोबत झालेल्या संभाषणाबाबत माध्यमांना सांगितले. बार काऊंसिलऑफ इंडिया आणि इंडियन एव्हिडन्स अ‍ॅक्टच्या नियमांनुसार असे करता येत नाही.  मी व माझ्या कुटुंबाशिवाय इतर कुणीही कुटुंब असल्याचा दावा केल्यास ते चुकीचे ठरेल.

के. के. सिंह पुढे म्हणाले, सुशांतच्या कुटूंबात फक्त मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे हे मी स्पष्ट करतो. आम्ही वरुण सिंह यांना आमचा वकील म्हणून नेमले होते आणि त्यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील विकास सिंह आमच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.