Pimpri News: आता जनताच करणार महापालिका अधिकाऱ्यांच्या वागणुकीचे मूल्यमापन;  कार्यालयात अभिप्राय अर्ज ठेवणार

एमपीसी न्यूज – विविध सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा अधिकारी कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा सहन करावा लागतो. पण, आता नागरिकांकडूनच कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे, कार्यालयीन कामकाजपद्धतीचे मूल्यमापन केले जाणार आहे. हे मूल्यमापन खुद्द नागरिकच करणार आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयात अभिप्राय नोंदविण्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 23 नोव्हेंबर 2016 रोजी माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत याबाबत आदेश जारी केला होता. राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने एका अपिलाच्या सुनावणीदरम्यान दिलेल्या निकालाच्या आधारे प्रत्येक सरकारी कार्यालयात अभ्यागतांना अभिप्रायासाठी
अर्ज ठेवण्यात यावेत. हे अर्ज ई-मेलद्वारे सेवा पुरविणाऱ्या सर्व नोडल प्राधिकरण किंवा पर्यवेक्षकांकडे पाठविण्यात यावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अभिप्राय अर्ज ठेवण्यात यावेत, असा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी 22 नोव्हेंबर रोजी दिला आहे.

यापुढे महापालिका कार्यालयांना कामानिमित्त भेटी देणाऱ्या नागरिकांनी या अर्जाद्वारे आपल्याला आलेल्या अनुभवांबाबतचे अभिप्राय नोंदवायचे आहेत. या अहवालांची दर तीन महिन्यांनी तपासणी होणार असून, संबंधित अधिकाऱ्यांसमोरच या फॉर्ममधील अभिप्राय वाचण्यात येणार आहेत. प्राप्त अभिप्रायाची योग्य नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रत्येक वर्षी प्रतिवेदन किंवा पुनर्विलोकन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या अभिप्रायांची नोंद संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकात गोपनीय अहवालात नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे या अधिकाऱ्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वागणुकीवर बदल्या, बढत्या यांचे भवितव्य ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.