ODI Series Ind Vs Aus : टिम इंडियाचा शेवट गोड, ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडत शेवट गोड केला. अंतिम सामन्यात 13 धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. भारताने उभारलेल्या 303 पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 289 धावांत आटोपला.

वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली सलामीला बढती मिळालेला लाबुशेन नटराजनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर शार्दुल ठाकूरने स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत कांगारुंची मैदानावर जम बसू पाहत असलेली जोडी फोडली. दोन सामन्यांत शतक झळकावणारा स्मिथ अखेरच्या वन-डेत 7 धावां काढून माघारी परतला. यानंतर हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात दोघांना यश येतंय असं दिसत असतानाच शार्दुलने हेन्रिकेजला माघारी धाडल. एक बाजू सांभाळून असलेल्या फिंचने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. फिंचने 82 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. जाडेजाने फिंचला बाद केलं.

त्यानंतर कॅमरुन ग्रीनही फारशी चमक दाखवू शकला नाही. यादरम्यान सामन्यावर भारताचं वर्चस्व होतं. परंतू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत मैदानात चौफर फटकेबाजी केली. भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम राखलं. 38 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह मॅक्सवेलने 59 धावा केल्यानंतर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर 47 व्या षटकांत अबॉटला माघारी धाडत शार्दुलने भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. यानंतर कांगारुंचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3, टी. नटराजन, जसप्रीत बुमराहने 2 तर कुलदीप आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

सुरवातीला भारताकडून हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्यातील शतकी भागीदारी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 302 अशा आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुबमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

फिरकीपटू अ‍ॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले. एककीकडे इतर फलंदाज माघारी परतत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. आपलं अर्धशतक झळकावत विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना केला. परंतू जोश हेजलवूडने विराटला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला, त्याने 63 धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा जोडीने पुन्हा एकदा संयमी खेळ करत महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हार्दिकने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अ‍ॅगरने 2 तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.