Dighi : चाळीस लाखांचा दीड क्विंटल गांजा जप्त; तिघांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी आणलेला 40 लाख रुपये किमतीचा 150 किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. यामध्ये विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

संजय मोहन गरड (वय 26, रा. कुकाणा, ता. नेवासा, अहमदनगर) अमोल रामभाऊ आगळे (वय 25), रामभाऊ घनश्याम आगळे (वय 50, दोघेही रा. कवठा, ता. नेवासा, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांना माहिती मिळाली की, मोशी आळंदी रोडवर डुडुळगाव येथे एक कार उभी आहे. त्यामध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने डुडुळगाव परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेली कार (एमएच 14 / एएम 6959) पोलिसांनी तपासली असता त्यामध्ये चाळीस लाख रुपये किमतीचा 150 किलो  गांजा आढळला. याबाबत चौकशी केली असता हा सर्व गांजा आरोपींनी विक्री करण्यासाठी आणला असल्याची माहिती मिळाली. यावरून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, प्रशांत महाले, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, राजन महाडिक, शकुर तांबोळी, दिनकर भुजबळ ,संतोष दिघे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अशोक गारगोटे, शैलेश मगर, संतोष भालेराव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.