Crime News : अटकेची भीती दाखवल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवल्याने जामीनदारावर दबाव आणला.त्याला अटक करण्याची भीती दाखवली.या भीतीपोटी जामीनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या नाना पेठेत सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा पोलीस कर्मचार्‍यांसह कर्जदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र राऊत असे आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे.याप्रकरणी त्यांची कन्या वैष्णवी राजेंद्र राऊत (वय २३, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण भातलावंडे (रा.गवळी वस्ती, मांजरी), सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम आणि पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलीस कर्मचारी समर्थ पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, किरण भातलवंडे यांनी कर्ज घेतले होते.तर राजेंद्र राऊत हे त्याला जामीनदार होते.आरोपी किरण याने रघुवीर बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्याकडून टाटा सुमो वित्त ही गाडी घेतली होती.मात्र त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नव्हते.त्यामुळे सहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम आणि पोलीस हवालदार सचिन बरकडे हे राऊत यांच्याकडे वारंवार कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी येत होते. तसेच त्यांना अटक करण्याची भीती दाखवत होते.अटक होऊ नये यासाठी त्यांनी वेळोवेळी सात ते आठ हजार रुपये दिले होते.

दरम्यान या सर्व त्रासानंतर राऊत यांनी किरण याला कर्ज फेडण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली होती. त्यानंतर राजेंद्र यांनी या सर्व त्रासाला कंटाळून सोमवारी सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.